क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतेच वृंदावन धाममध्ये अध्यात्मिक गुरू प्रेमानंदजी महाराज यांच्या दर्शनासाठी पोहोचले. अकाय आणि वामिका या दोन्ही मुलांसह त्यांनी प्रेमानंदजी यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्का हे दीर्घकाळापासून त्यांचे शिष्य आहेत. या व्हिडीओमध्ये दोघं त्यांच्याशी संवाद साधताना आणि त्यांना साष्टांग दंडवत करताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्काने दुसऱ्यांदा प्रेमानंदजी यांचं दर्शन घेऊन त्यांच्या किर्तनाला उपस्थित राहिले. याआधी जानेवारी 2023 मध्येही दोघं त्यांच्या दर्शनासाठी गेले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का गुरुजींना सांगते, “गेल्या वेळी आम्ही तुमच्या भेटीला आलो, तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न होते. मी विचार केला की तुम्हाला काहीतरी विचारेन, पण इथे बसलेल्या प्रत्येकाने त्याच संदर्भातील प्रश्न विचारले होते. मी जणू माझ्या मनातूनच तुमच्याशी संवाद साधत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी एकांतिक वार्तालाप (प्रेमानंदजी यांचे ऑनलाइन प्रवचन) पाहायचे तेव्हा पुन्हा एखादी व्यक्ती माझ्या मनातलाच प्रश्न तुम्हाला विचारताना दिसायची.” अनुष्का प्रेमानंद महाराजांशी बोलत असताना विराट त्याच्या मुलीसोबत काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी विराटच्या कुशीत मुलगी वामिका आणि अनुष्काच्या कुशीत मुलगा अकाय बसलाय. यानंतर अनुष्का त्यांना इतकंच सांगते की, “आम्हाला तुम्ही फक्त प्रेम आणि भक्ती द्या.”
Virat Kohli and Anushka Sharma with their kids visited Premanand Maharaj. ❤️
– VIDEO OF THE DAY…!!! 🙏 pic.twitter.com/vn1wiD5Lfc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2025
अनुष्काचं बोलणं ऐकल्यानंतर प्रेमानंद महाराज म्हणतात, “तुम्ही दोघं खूप धैर्यवान आहात. जगातील इतक्या सगळ्या गोष्टी संपादन केल्यानंतर भक्तीकडे वळणं खूप कठीण असतं. मला वाटतं तुमच्या भक्तीचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. नाप जपाचा अभ्यास केल्यास लौकिक आणि पारलौकिक दोन्हींमध्ये प्रगती होईल. देवाच्या नावाचा जप करा आणि खूप प्रेमाने, आनंदाने राहा.”
यावेळी ते विराटला म्हणाले, “यांच्यासाठी त्यांचं खेळच साधना आणि भक्ती आहे. त्यांचा विजय झाल्यावर संपूर्ण भारतातील मुलंबाळं खुश होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हीच साधना आणि भक्ती आहे. अभ्यासच सर्वांत महत्त्वपूर्ण आहे.” विराट आणि अनुष्का अशा पद्धतीने एखाद्या अध्यात्मिक ठिकाणी जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी दोघांनी कैंची धाममध्ये नीम करोली बाबा यांच्या आश्रमातही पोहोचले होते. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांना मुंबईतील एका किर्तनातही पाहिलं गेलं. त्यानंतर ते लंडनमध्येही एका किर्तनाला उपस्थित होते.