मुंबई : आयपीएल 2023 मध्ये नुकताच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना पार पडला. मॅच पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक अनेकदा त्यांच्या हातात विविध पोस्टर्स आणि प्लेकार्ड घेऊन येतात. त्यावर ते आवडत्या क्रिकेटरसाठी खास मजकूर लिहितात. अशातच एका लहान मुलाच्या हातातील प्लेकार्ड सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्या लहान मुलाच्या हातातील प्लेकार्डवर क्रिकेटर विराट कोहलीच्या मुलीसाठी मजकूर लिहिलेला होता. त्यावरूनच नेटकरी भडकले आहेत. आता अभिनेत्री कंगना रनौतनेही त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
‘हाय विराट अंकल, मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’, असं त्या प्लेकार्डवर लिहिलेलं होतं. एका लहान मुलाच्या हातात तो प्लेकार्ड देण्यात आला होता. ते पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी त्या मुलाच्या आईवडिलांवर टीका केली आहे. तर हे कोणत्याच प्रकारे योग्य नाही, असं काहींनी म्हटलंय. प्रकाशझोतात येण्यासाठी अशा पातळीवर घसरू नये, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.
मासूम बच्चों को ये बेहूदा बातें ना सीखायें, इससे आप मॉडर्न या कूल नहीं अश्लील और फूल लगते हो। https://t.co/dGC7OmOPvM
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 20, 2023
कंगना रनौतनेही त्या मुलाच्या आई-वडिलांवर टीका केली आहे. ‘निष्पाप मुलांना असा मूर्खपणा शिकवू नका. यामुळे तुम्ही मॉडर्न आणि कूल नाही तर अश्लील आणि फूल (मूर्ख) वाटता,’ असं तिने लिहिलंय. नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत लिहिलं, ‘यामुळे दोन मिनिटांची प्रसिद्धी मिळत असली तरी हे अत्यंत चुकीचं आहे.’ काहींनी आईवडिलांच्या संगोपनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या लहान मुलाच्या हातात तो प्लेकार्ड दिला आहे, त्याला त्याचा अर्थही माहीत नसेल, असंही काहींनी म्हटलं आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने वामिकाला जन्म दिला. विराट-अनुष्काने अद्याप वामिकाचा चेहरा माध्यमांना दाखवला नाही. तिचे फोटो किंवा व्हिडीओ न काढण्याची विनंती त्यांनी पापाराझी, फोटोग्राफर्स आणि माध्यमांना केली आहे. मात्र तरीही विराटच्या एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या विंगेत वामिकाला घेऊन उभ्या असलेल्या अनुष्काचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात वामिकाचा चेहरा स्पष्ट पहायला मिळाला होता. त्यानंतर विराट आणि अनुष्काने पोस्ट लिहित युजर्सना ते डिलिट करण्याची विनंती केली होती.