मुंबई : नुकताच ‘इंडियन आयडॉल 13’चा ग्रँड फिनाले पार पडला. या रिअॅलिटी शोमध्ये अयोध्येच्या ऋषी सिंहने बाजी मारली. इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीसह त्याला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. या बक्षिसासोबतच ऋषीला देशभरात प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर तो आधीपासूनच लोकप्रिय होता. दिवसेंदिवस त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढतेय. अशातच त्याच्या फॉलोअर्समध्ये आता एक मोठं नाव समाविष्ट झालं आहे. क्रिकेटर विराट कोहली सोशल मीडियावर ऋषीला फॉलो करतो. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऋषीचे 8 लाख 65 हजार फॉलोअर्स आहेत. त्यापैकी एक विराटचंही नाव आहे.
इंडियन आयडॉलच्या एका एपिसोडमध्ये खुद्द विराटने ऋषीसाठी खास संदेश पाठवला होता. सूत्रसंचालक आदित्य नारायण त्याविषयी म्हणाला होता, “तसं तर सर्वच स्पर्धक ऋषी सिंहच्या गायकीचे चाहते आहेत. जगभरात त्याच्या गायनकौशल्याचं कौतुक होतंय. आता क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा त्याचा चाहता बनला आहे. त्याने नुकतंच ऋषीला इन्स्टाग्रामवर फॉलो केलंय आणि सोबत खास मेसेजसुद्धा पाठवला आहे.”
या मेसेजमध्ये विराट म्हणाला होता, “हॅलो ऋषी, कसा आहेस तू? मी तुझ्या गायनाचे व्हिडीओ पाहिले आहेत. तू कमाल आहेस. मला तुझं गायनकौशल्य खूप आवडतं. ऑल द बेस्ट. तुझ्यावर नेहमीच देवाचा आशीर्वाद असेल.” खुद्द विराटकडून शुभेच्छा मिळाल्याने ऋषी सिंहलाही खूप आनंद झाला.
ऋषीने इंडियन आयडॉलच्या मंचावर परफॉर्म केल्यानंतर त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितलं होतं की तो त्याच्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही. इंडियन आयडॉलच्या थिएटर राऊंडनंतर तो जेव्हा घरी पोहोचला होता, तेव्हा ऋषीला समजलं होतं की त्याच्या आईवडिलांना त्याला दत्तक घेतलं आहे.
याविषयी ऋषी म्हणाला होता, “माझ्या आईवडिलांनी मला दत्तक घेतलंय. पण जर मी त्यांच्यासोबत नसतो, तर आज कदाचित मी या मंचावर पोहोचलो नसतो. मी माझ्या आयुष्यात जितक्या चुका केल्या आहेत, त्यासाठी मी माझ्या आईवडिलांची माफी मागू इच्छितो. मला त्यांच्या रुपात जणू देवच भेटले आहेत. नाहीतर आज मी कुठे असतो याची कल्पनाच मी करू शकत नाही.”
ऋषीला दत्तक घेतल्यानंतर त्याच्या आईवडिलांना अनेकांनी टोमणे मारले. “मला जन्म देणाऱ्या आईने मला सोडून दिलं. मात्र लहानपणी मी जेव्हा आजारी होतो, तेव्हा दत्तक घेतलेल्या या आईने तिची झोप विसरून माझी काळजी घेतली”, असं ऋषीने सांगितलं. मात्र आता ऋषीने इंडियन आयडॉलचं विजेतेपद जिंकून टीकाकारांचं तोंड गप्प केलंय, अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली.