मुंबई : फोटो आणि रिल्स पोस्ट करण्यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण ‘इन्स्टाग्राम’ या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सेलिब्रिटी या ॲपवर त्यांचे विविध फोटो चाहत्यांसाठी शेअर करतात, असं जर तुम्हाला वाटत असेल तर खरं कारण त्यापेक्षा वेगळंच आहे. सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर यांना ठराविक पोस्टसाठी चांगली रक्कम मिळते. सोशल मीडियावरील फोटो किंवा व्हिडीओसाठी त्यांना चांगलंच मानधन मिळतं. इन्स्टा स्टोरीसाठी कमी तर त्यापेक्षा जास्त पैसे पोस्टसाठी मिळतात. जर स्टोरीसोबत ब्रँड पेजची लिंक असेल तर त्यासाठी आणखी पैसे दिले जातात. पोस्टसोबतही ब्रँडची लिंक असेल तरी त्याला जास्त फी आकारली जाते. यामध्ये सर्वांत महागडी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा सेलिब्रिटी ब्रँडच्या पेजसोबत कोलॅब करतो.
विराट कोहली– 3.5 ते 5 कोटी रुपये
(25 कोटी फॉलोअर्स)
प्रियांका चोप्रा जोनास– 2 कोटी रुपये
(जवळपास 8.77 कोटी फॉलोअर्स)
श्रद्धा कपूर– दीड कोटी रुपये
(जवळपास 8.08 कोटी फॉलोअर्स)
आलिया भट्ट– दीड ते 2 कोटी रुपये
(जवळपास 7.74 कोटी फॉलोअर्स)
दीपिका पदुकोण– 2 कोटी रुपये
(जवळपास 7.41 कोटी फॉलोअर्स )
कतरिना कैफ– 1 कोटी रुपये
(जवळपास 7.28 कोटी फॉलोअर्स)
वर्षभरात हे सेलिब्रिटी जवळपास त्यांच्या कमाईच्या 20-30 टक्के भाग सोशल मीडियावरून कमावतात. त्यामुळे सोशल मीडिया हा सेलिब्रिटींसाठी किती महत्त्वाचा आहे, हे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. फक्त इन्स्टाग्रामच नाही तर ट्विटर, फेसबुक या साइट्सवरही पोस्ट करण्यासाठी त्यांना ब्रँडकडून पैसे दिले जातात. ब्रँडचं महत्त्व आणि शूटिंगसाठी लागणारा वेळ यावरून सेलिब्रिटी मानधनाची रक्कम ठरवतात.
फक्त सेलिब्रिटीच नाही तर इन्फ्लुएन्सर्सनाही इन्स्टाग्रामवरून बराच पैसा कमावता येतो. फॉलोअर्सच्या आकड्यावरून आणि लोकप्रियतेवरून ठराविक ब्रँड संबंधित इन्फ्लुएन्सरशी संपर्क साधतात. त्या ब्रँडच्या पोस्टसाठी, रिलसाठी किंवा स्टोरीसाठी त्यांना ठराविक रक्कम मानधन म्हणून दिली जाते. म्हणूनच गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सचं महत्त्व खूप वाढलं आहे. हल्ली बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या इन्फ्लुएन्सर्ससोबत प्रमोशनचे व्हिडीओ करताना दिसतात. अधिकाधिक चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वांत सोपा मार्ग असल्याचं समजलं जातंय.