मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये एक मुलगी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘बेशर्म रंग’ या गाण्यावर भरभरून टीका करत होती. ‘बॉलिवूडच्या विरोधात इशारा, जर तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात, तर पाहू नका’, असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. मात्र ट्रोलिंगनंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. आता त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. संबंधित ट्विटबद्दल प्रश्न विचारल्यावर अग्निहोत्री म्हणाले, “मला अशा लोकांचं फार वाईट वाटतं. ज्यांना एखाद्याच्या स्वभावाला बदलायचं असतं. लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज आहे.”
याच मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी अभिनेता रणवीर सिंगच्या भेटीचा किस्सा सांगितला. विवेक यांनी सांगितलं की ते रणवीरला एका अवॉर्ड शोदरम्यान भेटले होते. लोकांना असं वाटत होतं की त्या दोघांमध्ये मतभेद होतील, मात्र इतक्यात रणवीरने येऊन त्यांना मिठी मारली. इतकंच नव्हे तर रणवीर सर्वांसमोर विवेक अग्निहोत्रींच्या पाया पडला. रणवीर त्यावेळी अग्निहोत्रींना म्हणाला, “सर जेव्हा माझे न्यूड फोटो प्रदर्शित झाले, तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त तुम्हीच होता, ज्यांनी मला पाठिंबा दिला.”
“रणवीरबद्दलची ही गोष्ट मी कोणालाच आजवर सांगितली नव्हती. जर कोणाकडे त्याचा व्हिडीओ असेल तर कृपया तो शेअर करू नका”, अशीही विनंती त्यांनी या मुलाखतीत केली. इंडस्ट्रीतील तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत ते पुढे म्हणाले, “मी नेहमीच पूर्ण स्वतंत्र भाषणाबद्दल बोलतो. मी तर म्हणतो हेट स्पीचसाठीही (द्वेषपूर्ण भाषण) परवानगी दिली पाहिजे.”
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर त्याच्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आली होती. त्यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी रणवीरला पाठिंबा दिला होता. त्यांनी लिहिलं होतं, ‘आपल्या संस्कृतीत मानव शरीराची नेहमीच प्रशंसा झाली. मी म्हणेन की मानव शरीर ही ईश्वराची सर्वांच सुंदर रचना आहे. त्यात चुकीचं काय आहे?’