मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढाशी नुकताच साखरपुडा केला. या साखरपुड्याला प्रियांका चोप्रा, मनीष मल्होत्रा, अरविंद केजरीवाल, पी. चिदंबरम, आदित्य ठाकरे, भगवंत मान यांसह बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील बरेच पाहुणे उपस्थित होते. दिल्लीतील कपुरथळा इथल्या निवासस्थानी हा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले. योगायोग म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्याच वेळी लग्नाबद्दल एक ट्विट केलं. हेच ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी परिणीती आणि राघव यांना टोमणा मारला आहे, असा अंदाज काही नेटकरी वर्तवत आहेत.
दीपिका पदुकोण – रणवीर सिंग, आलिया भट्ट – रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा – कियारा अडवाणी, कतरिना कैफ – विकी कौशल यांसारख्या सेलिब्रिटींनंतर परिणीती आणि राघव हे सुद्धा प्रायव्हेट वेडिंगचा पर्याय निवडणार असल्याचं म्हटलं जातंय. लग्नानंतर या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले होते. हेच फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली जाते. तर आजकाल लग्न हे फोटोग्राफी अधिक होतात, असा टोला अग्निहोत्रींनी लगावला आहे.
“People are getting married just to get wedding photos, videos and to get ‘destination wedding’ tag for show off”.
– a wedding planner told me.It’s true I was in a destination wedding and someone said that the wedding photographer is going to be late and the bride fainted.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 13, 2023
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केलं, ‘लोक फक्त लग्नाचे फोटो, व्हिडीओ यांसाठी, दिखाव्यासाठी आणि ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा टॅग मिळवण्यासाठी लग्न करत आहेत. एका वेडिंग प्लॅनरने मला हे सांगितलं आहे. हे खरंय. मी एका डेस्टिनेशन वेडिंगला गेलो होतो आणि तिथे एकाने म्हटलं की वेडिंग फोटोग्राफरला उशीर होणार आहे. हे ऐकताच वधू बेशुद्ध झाली.’ या ट्विटद्वारे त्यांनी परिणीती आणि राघव यांना टोमणा मारला की काय, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
‘पूर्णपणे सहमत, हे विराट – अनुष्काच्या लग्नानंतर सुरू झालं. मात्र त्यांचं लग्न अत्यंत प्रामाणिक आणि संस्कारी होतं. आता काही कपल फक्त सोशल मीडियासाठी खोट्या क्षणांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतायत’, असं एकाने लिहिलं. तर ‘शोबाजी’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं.
राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे नेते असल्याने या साखरपुड्याला राजकीय वर्तुळातून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
साखरपुड्यानंतर परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राघव यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यासाठी दोघांचा अत्यंत साधा आणि तितकाच आकर्षक अंदाज पहायला मिळाला. परिणीती आणि राघव यांनी साखरपुड्यासाठी मोती रंगाच्या पोशाखाला पसंती दिली. मनीष मल्होत्राने परिणीतीचे कपडे डिझाइन केले होते. तर राघव यांनी परिधान केलेला अचकन हा त्यांच्या काकांनीच डिझाइन केला होता. ‘ज्या प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रार्थना केली होती.. मी हो म्हणाले’, असं कॅप्शन देत परिणीतीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.