अभिनेता विवेक ओबेरॉयने ‘मस्ती’, ‘साथियाँ’, ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’, ‘ओमकारा’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केलं. लोकप्रियता मिळवूनही विवेकला काम मिळणं बंद झालं होतं. याविषयी तो विविध मुलाखतींमध्ये अनेकदा व्यक्त झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने फिल्म इंडस्ट्रीतील लॉबिंग कल्चरबद्दल खुलासा केला. “मी गेल्या काही काळापासून बिझनेस करतोय. माझ्या आयुष्यातील एक काळ असा होता, जेव्हा माझे चित्रपट हिट ठरत होते, माझ्या परफॉर्मन्सचं कौतुक होत होतं, पण तरी वेगळ्या कारणांमुळे मला भूमिका मिळत नव्हत्या”, असं विवेकने सांगितलं. फिल्म इंडस्ट्रीतील लॉबिंग कल्चरचा मी बळी ठरलो, असं विवेक म्हणाला.
‘इंडिया न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत तो याविषयी पुढे म्हणाला, “सर्वकाही चांगलं असतानाही जर तुम्हाला काही वेगळ्या कारणांमुळे ऑफर्स मिळत नसतील, तुम्ही सिस्टिम आणि लॉबीचे शिकार झाले असता तेव्हा तुमच्याकडे दोनच पर्याय उपलब्ध असतात. एकतर तुम्ही नैराश्यात जाता किंवा या परिस्थितीचा स्वीकार आव्हान म्हणून करत स्वत:चं नशीब लिहिता. मी दुसरा पर्याय निवडला आणि त्यामुळे काही बिझनेस सुरू करू शकलो.”
विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यातील वाद जगजाहीर आहे. सलमानने धमकी दिल्याचा आरोप विवेकने एका पत्रकार परिषदेत केला होता. 2003 मध्ये विवेकने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केले होते. तेव्हापासूनच सलमानमुळे विवेकला इंडस्ट्रीत काम मिळणं बंद झालं, असं म्हटलं जातं. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कतरिना कैफने स्पष्ट केलं होतं की ती विवेकसोबत कधीच काम करणार नाही. कतरिनाला सलमाननेच बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं.
विवेकला जेव्हा कतरिनाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, “त्या महिलेला खरंच माझ्यासोबत काम करायचं नाही? तो तिचा विशेषाधिकार आहे. वैयक्तिक बोलायचं झालं तर मी माझ्या कामाकडे तितक्या बारकाईने पाहत नाही. ज्या कथेत मला ज्यांच्यासोबत काम करायची गरज असते, मी करतो. माझ्या वैयक्तिक आवडी-निवडीवरून मी निर्णय घेत नाही. असो, मी अशा नकारात्मकतेकडे लक्ष देणार नाही.”
अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करू लागल्यानंतर विवेकच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर त्याने एकेदिवशी थेट पत्रकार परिषद घेत ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सलमान खानवर धमकी दिल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर विवेकचं करिअर पूर्णपणे पालटलं होतं. त्याला काम मिळणं बंद झालं होतं.
याविषयी विवेकचे वडील सुरेश ओबरॉय म्हणाले होते, “यातून बाहेर पडण्यात त्यानेच संपूर्ण ताकद लावली होती. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तो व्यसनाधीन किंवा ड्रग्जच्या आहारी गेला असता. अनेक लोक त्याच्या विरोधात होते. मीडिया, फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि अभिनेतेसुद्धा.. कधी कधी जेव्हा एखाद्याला पटकन यश मिळतं, तेव्हा इतरांना ते सहन होत नाही.”