अभिनेता विवेक ओबेरॉय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील त्याच्या नकारात्मक काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. फिल्म इंडस्ट्रीत आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या काही जणांनी मिळून माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा खुलासा विवेकने केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक म्हणाला, “जेव्हा तुम्ही वाईट काळातून जाता, तेव्हा माणसाचा अनुभव त्या काळाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. जर त्या वाईट काळाची तीव्रता कमी असेल आणि कालावधीही फारसा नसेल तर एखादी व्यक्ती त्यातून लगेच बाहेर पडू शकते. पण जेव्हा त्या नकारात्मकतेची तीव्रता आणि कालावधी दोन्ही मोठे असतात, तेव्हा त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटतं की आपण बरे होतोय, तेव्हाच ती जुनी जखम वर येऊन पुन्हा वेदना देऊन जाते.”
“अशा नकारात्मकतेतून बाहेर पडणं हे फक्त आपल्याच हातात असतं. ती पाटी पासून त्यावर ‘पुरे झालं’ हे आपल्यालाच लिहावं लागतं. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपणच प्रयत्न केले नाहीत, तर पुढे जाणं अशक्य होतं. माझ्या बाबतीत तीव्रता खूपच जास्त होती. मी ट्रोलिंग, सार्वजनिक अपमान आणि करिअरमध्ये फटका या सगळ्या गोष्टी एकत्र सहन करत होतो. माझ्याकडून प्रोजेक्ट्स हिरावल्या जात होत्या. मला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत होत्या. पोलिसांना मला सुरक्षा पुरवावी लागली होती”, असा खुलासा विवेकने केला.
“त्यावेळी गोष्टी एका वेगळ्याच पातळीवर घडत होत्या. अशा परिस्थितीत माणूस शांत राहू शकत नाही. मला सुरक्षा पुरवली होती म्हणून मी ठीक होतो. पण माझ्या आईवडिलांचं, बहिणीचं काय? त्यांच्या सुरक्षेबाबत मी सतत चिंतेत होतो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या कामावर झाला होता. मी कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नव्हतो. हळूहळू माझ्या करिअरला फटका बसू लागला होता. तरीही मी धाडस करून स्वत:ला त्या परिस्थितीतून वर आणलं”, अशा शब्दांत विवेक व्यक्त झाला.
विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यातील वाद जगजाहीर आहे. सलमानने धमकी दिल्याचा आरोप विवेकने एका पत्रकार परिषदेत केला होता. 2003 मध्ये विवेकने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केले होते. तेव्हापासूनच सलमानमुळे विवेकला इंडस्ट्रीत काम मिळणं बंद झालं, असं म्हटलं जातं. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कतरिना कैफने स्पष्ट केलं होतं की ती विवेकसोबत कधीच काम करणार नाही. कतरिनाला सलमाननेच बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं.