मुंबई : 20 मार्च 2024 | टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेनाने गेल्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो रमजान महिन्यातील रोजाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इस्लाम धर्माचं पालन करत असल्यापासून विवियनचा हा सहावा रमजान आहे आणि यावर्षीही तो रोजा करणार आहे. विवियनने इजिप्तमधील माजी पत्रकार नौरान अलीशी लग्न केलंय. रमजानदरम्यान बहरीनमध्ये असलेल्या आपल्या कुटुंबीयांसोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करत असल्याचं त्याने सांगितलं.
‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये दिलेल्या मुलाखतीत विवियन म्हणाला, “मी रमजानच्या महिन्यातच इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे माझ्यासाठी रमजानचा काळ खूप खास आहे. यावर्षीचं माझं हे सहावं रमजान असून मी दरवर्षी रोजाचं पालन करतोय. रमजानच्या संपूर्ण महिन्यात रोजाचं पालन करणं आवश्यक असतं आणि इस्लामच्या पाच मुलभूत गोष्टींपैकी हे एक आहे. त्यामुळे आजारपणाचं कारण नसलं तर मी 30 दिवस रोजा आवर्जून पाळतो.”
रोजाचं पालन करणं शक्य होईल का, असा प्रश्न त्याला सुरुवातीला पडला होता. कारण पाणी आणि कॉफी या दोन गोष्टींशिवाय दिवस जात नसल्याचं विवियन म्हणाला. त्यामुळे या गोष्टींशिवाय इतके तास रोजाचं पालन करू शकेन का, असा त्याला प्रश्न होता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मी हे नाकारू शकत नाही की सुरुवातीला मला रोजाविषयी फार चिंता होता. कारण पाणी आणि कॉफी या दोन गोष्टी मला हव्याच असतात. माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींनाही काळजी वाटत होती. 13 ते 14 तास मी पाणी किंवा कॉफीशिवाय कसा राहतोय, असा प्रश्न त्यांना पडायचा. मात्र अल्लाहच्या कृपेने मी रोजाचं पालन व्यवस्थितरित्या करू शकतोय.”
विवियनने 2022 मध्ये नौरान अलीशी लग्न केलं. इजिप्तमध्येच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांना एक मुलगी आहे. विवियनचं हे दुसरं लग्न असून त्याआधी त्याने अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेतून विवियन घराघरात पोहोचला आणि याच मालिकेदरम्यान विवियन आणि वाहबिज एकमेकांच्या प्रेमात पडले होते.