Amruta pande : भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे पोलीस देखील गोंधळले आहेत. आतापर्यंत अमृता पांडे हिने आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. 27 एप्रिल रोजी तिचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अमृताने आत्महत्या केली नसून तिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. मात्र हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता पोलिसांसाठी आव्हान बनला आहे. एफएसएलच्या अहवालात तिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याने कोणत्या अहवालाच्या आधारे तपास करावा असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पोलीस अमृता पांडेचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना पत्र लिहिण्याचा विचार करत आहेत. पत्राद्वारे काही प्रश्न विचारले जातील आणि माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर डॉक्टरांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत.
भागलपूरचे एसएसपी आनंद कुमार म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि एफएसएल रिपोर्ट पूर्णपणे वेगळे आहेत. एफएसएल अहवालात ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पॅनेल तयार करण्यात आले असून, फॉरेन्सिक लॅबच्या एचओडीला चौकशीची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने सखोल चौकशी केली जाईल.
27 एप्रिल रोजी अमृता पांडेचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये आढळला होता. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नव्हती. साडीचा फास, मोबाईल फोन आणि इतर काही वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. मृत्यूपूर्वी अमृताने तिच्या फोनवर व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट केले होते, ज्यामुळे गूढ निर्माण झाले होते. स्टेटसमध्ये लिहिलं होतं- तिचा जीव दोन बोटींवर होता. आमची बोट बुडवून आम्ही त्याचा प्रवास सुकर केला.
कुटुंबीय आणि अमृता पांडेचे पती चंद्रमणी झांगड यांनी सांगितले की, अमृता ही डिप्रेशनमध्ये होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. तिने याआधीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तिच्या पतीने तिला वाचवले होते. जोगसर पोलिसांना अमृता पांडेचा शवविच्छेदन अहवाल गुरुवारी 2 मे रोजी प्राप्त झाला. जो एफएसएल अहवालापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आता नवीन संभ्रम निर्माण झाला आहे.