केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका महिला कॉन्स्टेबलने चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संबंधित कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं असून तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवरून विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या घटनेबाबत मौन सोडलं आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांनी करणला त्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने मोकळेपणे उत्तर दिलं. कंगना आणि करण यांच्यात फार जुना वाद आहे. मात्र हा वाद असूनही करणने कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेचं समर्थन केलं नाही. त्याने त्याचा विरोध केला.
“मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं मग ते शाब्दिक असो किंवा शारीरिक स्वरुपाचं असो.. त्याचं समर्थन करत नाही किंवा त्याचा स्वीकार करत नाही”, असं म्हणत करणने स्मितहास्य केलं. कंगनाच्या या घटनेबाबत बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी सुरुवातीला कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अनेकांनी त्यावर मौन बाळगणं पसंत केलं होतं. तेव्हा कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला होता.
#WATCH | Mumbai: On Kangana Ranaut slapped by CISF woman constable, filmmaker Karan Johar says, “I do not support or condone any form of violence, verbal or physical.” pic.twitter.com/WAiSHneYZx
— ANI (@ANI) June 12, 2024
“प्रिय फिल्म इंडस्ट्री, माझ्यावर एअरपोर्टवर झालेल्या घटनेबाबत तुम्ही एकतर साजरा करत असाल किंवा त्याबद्दल पूर्णपणे मौन बाळगून असाल. लक्षात ठेवा, उद्या जर तुम्ही तुमच्या देशात रस्त्यावर किंवा जगात कुठेही नि:शस्त्रपणे चालत असाल आणि काही इस्रायली/ पॅलेस्टिनी यांनी केवळ तुम्ही रफाहविरोधात बोललात म्हणून तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना मारलं, तर तेव्हा मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढताना दिसणा आहे. जर एखाद्या दिवशी तुम्हाला प्रश्न पडला असेल की याठिकाणी का आहे, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही मी नाही”, अशी पोस्ट तिने लिहिली होती. मात्र काही वेळानंतर ही पोस्ट डीलिटसुद्धा केली होती.
चंदीगड विमानतळावरील घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत नेमकं काय घडलं होतं, याविषयी सांगितलं. “दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मला थप्पड मारली आणि शिवीगाळ केली. जेव्हा मी तिला असं का केलं विचारलं असता, तिने मला ती शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचं सांगितलं”, असं ती म्हणाली. यामध्ये तिने सांगितलं की, ती सुरक्षित आणि ठीक आहे. पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे ती चिंतेत आहे.