छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानीने फेब्रुवारी 2021 मध्ये मुलाला जन्म दिला. गरोदरपणात अनिताचं वजन खूपच वाढलं होतं. आता जवळपास अडीच वर्षांनंतर अनिताने तिचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन शेअर केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिताने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं. बाळंतपणानंतर अनिताने वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंगचाही सामना केला होता. मात्र ट्रोलिंगला न जुमानता शारीरिक आणि स्वास्थ्याकडे अधिक लक्ष दिल्याचं तिने स्पष्ट केलं.
प्रेग्नंसीनंतर अनेक सेलिब्रिटी ताबडतोब वजन कमी करण्यामागे धावतात. मात्र मी तसं काहीच केलं नाही, असं अनिता म्हणाली. तिने वजन कमी करण्यासाठी जवळपास दोन ते अडीत वर्षांचा कालावधी घेतला.
'माझं ध्येय आता फार लांब नाही. हा सातत्य आणि सकारात्मक राहिल्याचा परिणाम आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात विविध टप्पे येतात. पण त्यात कधीच हार मानू नये', असं तिने सोशल मीडियावर लिहिलंय.
वजन कमी करण्याबद्दल अनिता म्हणाली, "अर्थातच हे खूप कठीण होतं. पण प्रत्येक महिलेला गरोदरपणानंतर अशा बदलांना सामोरं जावं लागतं. मी वजन कमी करण्याची घाई केली नाही. माझ्या परीने मी गोष्टी हाताळल्या आहेत."
मुलाच्या जन्मानंतर अनिताचं वजन 76 किलो झालं होतं. आता अडीच वर्षांत बरंच वजन कमी करून ती 58 किलोंची झाली आहे. आणखी पाच किलो वजन कमी केल्यानंतर पूर्ववत होणार असल्याचं अनिताने सांगितलं.
"अभिनेत्री असल्याने लोक वजन आणि दिसण्याबाबत खूप ताण घेतात आणि त्यातून झटपट उपाय शोधतात. मला हेच करायचं नव्हतं. मला माझ्या गरोदरपणातील काळाचा, माझ्या मुलासोबतच्या वेळेचाही आनंद लुटायचा होता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मानसिकदृष्ट्या तयार व्हावं लागतं. बाळाच्या जन्मानंतर तुमच्या शरीरात बरेच बदल होतात", असं ती पुढे म्हणाली.
"जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हा तुम्हाला इतक कोणत्याच गोष्टीची पर्वा नसते. कारण आईच्या कर्तव्यात तुम्ही पूर्णपणे मग्न होता. मी मानसिकदृष्ट्या तयार होण्याची प्रतीक्षा केली. मलासुद्धा काहींनी ट्रोल केलं. पण त्याचा मी ताण घेतला नाही. मी अभिनेत्री आहे म्हणून मी वजन कमी केलं नाही", असंही अनिता म्हणाली.