संध्या थिएटरमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? अल्लू अर्जुनवर अटकेची वेळ का आली?

| Updated on: Dec 13, 2024 | 1:26 PM

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. या गर्दीत एका महिलेनं आपला जीव गमावला.

संध्या थिएटरमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं? अल्लू अर्जुनवर अटकेची वेळ का आली?
Allu Arjun
Image Credit source: Instagram
Follow us on

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये करण्यात आलं होतं. या प्रीमिअरदरम्यान अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीत श्वास गुदमरल्याने 35 वर्षीय एम. रेवती महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या 9 वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. महिलेच्या मृत्यूप्रकरणी आता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं पोलीस उपायुक्त म्हणाले.

नेमकं काय घडलं होतं?

‘पुष्पा 2’ हा चित्रपट आणि अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर लोकांनी खूप गर्दी केली. मात्र अल्लू अर्जुन आणि चित्रपटातील इतर कलाकार कोणत्या वेळी त्याठिकाणी येतील, याबद्दलची माहिती थिएटर व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांच्या टीमकडून पोलिसांना देण्यात आली नव्हती. इतकंच काय तर थिएटर मॅनेजमेंटने गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नव्हती. थिएटर व्यपस्थापनाला कलाकारांच्या येण्याची माहिती असतानाही त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला होता, अशी माहिती चिक्कडपल्ली पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर बी. राजू नाईक यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

रेवतीचा जीव कसा गेला?

रात्री 9.30 च्या सुमारास अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसह थिएटरमध्ये आला. तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांनी त्याच्यासोबत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी तिथे लोकांचा मोठा जमाव होता. अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले. या गर्दीत रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज यांचा श्वास गुदमरला. त्यानंतर लगेचच ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खालच्या बाल्कनीतून बाहेर काढलं. त्यांनी रेवती यांच्या मुलावर सीपीआर करून त्यांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मुलाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

रेवती यांच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाने सांगितलं, “दीर्घकाळ प्रतिसाद न दिल्याने, संभाव्य तीव्र हायपोक्सिया आणि फुफ्फुसांवरील संभाव्य आघातामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. आजूबाजूच्या लोकांनी आणि पोलिसांनी तातडीने सीपीआर दिल्याने आणि पुढील वैद्यकीय उपचारांमुळे मुलाला वाचवण्यात यश मिळालं आहे.”