‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सर्वांना आपल्या विनोदबुद्धीने हसवणारा रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग यांने कुटुंबियांना आणि चाहत्यांना चिंतेत टाकलं आहे. अभिनेता गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस अभिनेत्याच्या शोधात आहे. पण त्याच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. गुरुचरण याच्यासोबत फोनवर देखील बोलणं होत नसल्यामुळे अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 10 दिवसांपेक्षा अधिक काळ होऊन गेला तरी देखील पोलिसांकडून कोणतीच अपडेट मिळाली नसल्यामुळे गुरुचरण याचा वडिलांनी खतं व्यक्त केली.
गुरुचरण सिंग याचे वडील हरगीत सिंग म्हणाले, ‘जे झालं ते हैराण करणारं आहे… समोर आलेल्या प्रसंगाचा कसा सामना करायला हवा याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. प्रचंड चिंतेत आहोत. पोलीस काय अपडेट देतील याचीच प्रतीक्षा करत आहोत. गुरुचरण कधी घरी परत येतो याच्याच प्रतीक्षेत आम्ही आहोत…’
सांगायचं झालं तर, 22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग सोढी बेपत्ता झाला होती. बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी अभिनेत्याने वडिलांना शुभेच्छा देत एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याबद्दल सांगताना अभिनेत्याचे वडील म्हणाले, ‘सेलिब्रेशन झालं नव्हतं. फक्त कुटुंबातील सर्व सदस्य घरी होते. आनंदमय वातावरण होतं. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी गुरुचरण याला मुंबईसाठी निघायचं होतं…’
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग दिल्लीहून मुंबई येथे निघाला. पण अभिनेता विमानात बसलाच नाही. गुरुचरण याला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर मैत्रीण भक्ती सोनी येणार होत्या. पण अभिनेता पोहोचलाच नसल्यामुळे भक्ती सोनी परत घरी आल्या. याबद्दल भक्ती सोनी म्हणाल्या, ‘मी विमानतळावर गेली होती. त्याची प्रतीक्षा केली. पण मला असं वाटलं त्याने मुंबईत येणं रद्द केलं असेल…’
पुढे भक्ती सोनी म्हणाली, ‘मी सतत गुरुचरण याला फोन करत होती. पण त्याच्याकडून कोणतंच उत्तर येत नव्हतं. आम्ही आता फक्त गुरुचरण परत कधी येईल याच प्रतीक्षेत आहोत. मी सतत त्याच्या आईच्या संपर्कात आहे…’ अभिनेत्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गुरुचरण सिंग याने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा कट रचला आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. पण अद्याप अभिनेत्याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही.