नवी दिल्ली : 27 फेब्रुवारी 2024 | देशातील सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क ‘टीव्ही 9’च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या वार्षिक कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस आहे. या कॉन्क्लेव्हच्या खास ‘सत्ता संमेलना’त अनेक मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळत आहे. टीव्ही9 च्या या महामंचावर बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खाननेही हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत पूर्व पत्नी किरण रावसुद्धा होती. किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी आमिर आणि किरण या ‘सत्ता संमेलना’त मोकळेपणे व्यक्त झाले.
आपल्या चित्रपटाविषयी किरण म्हणाली, “जेव्हा मी या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझा मुलगा आझाद खूप लहान होता. त्यामुळे मला त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायचा होता. मुलासोबतचा काळ मी खूप एंजॉय केला. 2018 मध्ये हा चित्रपट बनवण्यास सुरुवात केली होती आणि त्यासंदर्भातील काम सुरू केलं होतं. मात्र स्क्रिप्ट निश्चित करण्यासाठी आणि त्यानंतर योग्य कलाकारांची निवड करण्यात खूप वेळ गेला.” चित्रपटाला लागलेल्या वेळाबद्दल आमिरने सांगितलं, “धोबी घाट या चित्रपटाच्या यशानंतर किरण तिच्या पुढच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक होती. मात्र त्यावर काम करणं शक्य होत नव्हतं. आझादला एकटं सोडून ती पूर्णवेळ कामावर लक्ष देऊ शकत नव्हती. तिच्या कामात आईची ममता मध्ये आली. आता आझाद थोडा मोठा झाल्याने किरण तिच्या चित्रपटांसाठी मोकळी झाली आहे.”
चित्रपटाविषयी किरण पुढे म्हणाली, “लेखकांच्या टीमने खूप सुंदर स्क्रिप्ट लिहिली होती. त्यांनी लिहिलेली कथा इतकी रंजक होती की त्या कथेला मोठ्या पडद्यावर मांडणं हा एक वेगळा अनुभव होता. म्हणूनच मला थोडा जास्त वेळ लागला. जर चित्रपटाची स्क्रिप्ट चांगली नसती तर हा चित्रपट बनू शकला नसता.” किरणच्या चित्रपटात आमिर खानची भूमिका का नाही असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आमिर हसत म्हणाला, “मला किरणच्या चित्रपटातून नाकारलं गेलं होतं. रवी किशनने ती भूमिका साकारली आहे आणि त्यांनी भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.”
यावेळी आमिरनेही त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी सांगितलं. “मी सध्या ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटावर काम करतोय. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल. यामध्ये माझी मुख्य भूमिका आहे. याशिवाय मी लापता लेडीज या चित्रपटालाही आपलंच मानतो. कारण मी स्वत: या चित्रपटाशी जोडला गेलोय. या दोन चित्रपटांशिवाय माझा ‘अतीसुंदर’ हा प्रोजेक्टसुद्धा सुरू आहे. पुढच्या सहा महिन्यात त्याचंही काम पूर्ण होईल”, असं तो म्हणाला.