बदलापूरमधील नामांकित आदर्श विद्या मंदिर शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापुरात नागरिकांचा रोष पहायला मिळाला. संतप्त पालक आणि नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन केलं, तोडफोडही केली. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावरील रुळांवर ठिय्या आंदोलन केलं. चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट लिहित न्यायाची मागणी केली. अभिनेता रितेश देशमुखच्या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. आरोपीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ‘चौरंग शिक्षा’ दिली जावी, अशी मागणी त्याने केली आहे. ही चौरंग शिक्षा म्हणजे काय ते जाणून घेऊयात..
पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी ऊर्फ भिकाजी गुजरने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर आलं होतं. माँसाहेब जिजाऊ यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी ऊर्फ भिकाजी गुजरला बोलावून घेतलं. सर्वांसमोर महाराजांनी त्याची चौकशी केली आणि त्याअंती गुन्हा सिद्ध झाला. गुन्हा इतका गंभीर होता की त्यासाठी साधी शिक्षा दिली तर रयतेत उठसूठ कोणीही हे दुष्कर्म करेल याची महाराजांना जाण होती. तेव्हा त्यांनी चौरंगाची शिक्षा देण्याचं फर्मान दिलं होतं.
महिलेसोबत केलेल्या दुष्कर्माबद्दल त्याचे हातपाय कलम करण्यात आले होते. हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्राव होऊन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बुडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही, मग तो कोणीही असो याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग अशी कठोर शिक्षा दिली होती. या शिक्षेनंतर त्याच्या पालनपोषणाची व्यवस्थाही महाराजांनी केली. बाबाजी निपुत्रिक असल्याने त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करण्याची तयारी गुजर कुळीच्याच सोनजी बिन बनाजी गुजर याने दर्शवली होती. महाजारांनी त्याबदल्यात त्याल रांझेची पाटीलकी देऊन बाबाजीला पालनपोषणासाठी त्याच्या स्वाधीन केलं होतं.
‘एक पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय, वैतागलोय आणि चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केलं. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वत:च्या घराइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली, चौरंग – हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे’, अशा शब्दांत रितेशने संताप व्यक्त केला होता.