बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतने हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तिने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केलाय. कंगनाने 74 हजार 755 मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. पण कंगना विजयाचा आनंद साजरा करत असतानाच एका महिला CISF जवानाने तिला कानशिलात लगावली. खासदार कंगना राणौत चंदीगड विमानतळावर असताना तिला महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. कंगनावर हल्ला करणाऱ्या गार्डचे नाव कुलविंदर कौर आहे. कंगना भाजपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विमानाने दिल्लीला येत असताना ही घटना घडली.
ड्युटीवर असलेल्या कुलविंदर कौरने कंगनाच्या कानशिलात लगावली. आरोपी महिला शिपायाचे म्हणणे आहे की, कंगना राणौतने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे तिला खूप राग होता. कंगनाने देखील तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत घडलेली घटना सांगितली. या महिला सीआयएसएफ जवानाने दिला शिवीगाळही केल्याचा आरोप कंगनाने केला आहे. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. कुलविंदर कौलच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावर काही शेतकरी नेत्यांनी राजकारण सुरू केले आहे. जेव्हा कोणी खासदारावर हल्ला करतो किंवा गैरवर्तन करतो तेव्हा त्याला शिक्षेची तरतूद काय आहे. जाणून घेऊयात.
भारतात कुणाला कानशिलात मारणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते, त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये, पोलीस आयपीसी कलम 323 अंतर्गत गुन्हा नोंदवतात. आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत, जर एखाद्याने स्वेच्छेने एखाद्याला दुखापत किंवा हानी पोहोचवली, तर असे केल्यास त्याला 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. घटनेच्या वेळी कोणीतरी गैरवर्तन केले आणि नंतर घटना घडवून आणली हे सिद्ध झाल्यास, न्यायालय शिक्षेत बदल देखील करू शकते.
जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला धमकावण्यासाठी गुन्हेगारी शक्ती किंवा प्रतिकात्मक हल्ला केला आणि त्याला कोणतीही हानी झाली नाही परंतु पीडित घाबरली तर कलम 358 अंतर्गत आरोपी दोषी मानला जाईल. भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 352 म्हणते की, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही चिथावणीशिवाय पीडितेवर हल्ला केला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केला, तर अशा प्रकरणांमध्ये तीन महिन्यांपर्यंत कारावास आणि 500 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, तपास अहवाल समोर आल्यानंतर कोणती कलमे लावायची हे ठरवता येते. दुसरीकडे, कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISF महिला शिपायावरही सेवेशी संबंधित कारवाई केली जाऊ शकते.