बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान आणि गौरी खान यांनी जवळपास 33 वर्षांपूर्वी लग्न केलं. हे आंतरधर्मीय लग्न असलं तरी दोघं एकमेकांच्या धर्माचा आदर करतात आणि सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. गौरी आणि शाहरुखचं आंतरधर्मीय लग्न हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. गौरीने इस्लाम धर्माच्या शाहरुखशी लग्न केलं असलं तरी लग्नानंतर तिने धर्मांतर केलं नाही. ऑक्टोबर 1991 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. सुरुवातीला गौरीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. “माझ्या कुटुंबीयांशी ओळख करून देताना मी शाहरुखचं नाव अभिनव असं सांगितलं होतं. जेणेकरून तो हिंदू आहे असं त्यांना वाटेल. पण ते खूपच बालिश आणि मूर्खपणाचं होतं”, असं गौरी एका मुलाखतीत म्हणाली होती.
लग्नाच्या वेळी गौरीच्या कुटुंबीयांना तिची फार काळजी वाटत होती. लग्नानंतर शाहरुख तिला धर्मांतर करण्यास भाग पाडेल, असं त्यांना वाटत होतं. फरिदा जलाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, “मला आठवतंय की गौरीचे पारंपरिक विचारांचे कुटुंबीय घरात बसले होते. ते एकमेकांशी कुजबुज करत होते की मुलगा मुस्लीम आहे. तो तिचं नाव बदलणार का? लग्नानंतर ती पण मुस्लीम होईल का? या सर्व चर्चा ऐकून मी मस्करीत म्हटलं, चल गौरी.. तुझा बुरखा घाल आणि नमाज पठण करायला बस. त्यावेळी संपूर्ण कुटुंब आम्हा दोघांकडे बघत होतं. मी गौरीचं धर्मांतर आधीच केलं की काय, असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे झळकत होता. मी अजून त्यांची मस्करी केली. त्यांना म्हटलं, यापुढे ती नेहमी बुरखा घालणार आहे तिचं नाव आयेशा असं असेल.”
‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या सिझनमध्ये गौरी धर्मांतर न करण्याच्या तिच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “आमच्यात संतुलन आहे. मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ असा नाही की मी धर्मांतर करेन. माझा असा विश्वास आहे की प्रत्येकाने त्याच्या धर्माचं पालन करावं आणि इतरांच्या धर्माविषयी मनात आदर असावा. शाहरुख कधीच माझ्या धर्माचा अपमान करणार नाही”, असं ती म्हणाली होती. याचंच उदाहरण तिने ‘लेडीज फर्स्ट’ या मुलाखतीत दिलं होतं. “दिवाळीला मी पुजेला सुरुवात करते आणि सर्व कुटुंबीय माझ्यानुसार पूजा करतात. ईदला शाहरुख पुढाकार घेतो आणि आम्ही सर्वजण त्याला फॉलो करतो. हे सर्व खूप सुंदर आहे आणि आमचं मुलंसुद्धा दोन्ही परंपरेचं पालन करतात. त्यांच्यासाठी दिवाळी आणि ईद दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत”, असं गौरीने सांगितलं होतं.