अभिनेता गोविंदाने नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शकांची रांग लागायची, असं म्हटलं जायचं. त्यावेळी गोविंदा दिवसातून पाच शिफ्ट्समध्ये काम करायचा. चित्रपटांसोबतच गोविंदा त्याच्या अफेअर्समुळेही चांगलाच चर्चेत असायचा. काही सहअभिनेत्रींसोबत गोविंदाचं नाव जोडलं गेलं होतं आणि मॅगझिनमध्ये त्यांचे अनेक किस्से छापले जायचे. विशेष म्हणजे त्यावेळी गोविंदाने सुनिता अहुजाशी लग्न केलं होतं. तरीही सहअभिनेत्रींबद्दल तो मुलाखतींमध्ये मोकळेपणे बोलायचा. अशाच एका मुलाखतीत गोविंदाने म्हटलं होतं की, त्याची दोन लग्न होणार असं त्याच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे. 1990 मध्ये गोविंदाने ही मुलाखत दिली होती. आता गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान त्याची ही मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा अभिनेत्री नीलम आणि तिच्या प्रेमात पडण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. इतकंच नव्हे तर सुनिताशी लग्न करण्याचं वचन दिल्यामुळे केवळ ते पाळण्यासाठी तिच्यासाठी लग्न केल्याचं त्याने म्हटलं होतं. “उद्या, कोण जाणे.. कदाचित मी पुन्हा एखादीच्या प्रेमात पडेन आणि कदाचित मी त्या मुलीशी लग्नही करेन जिच्या प्रेमात मी गुंतून जाईन. पण सुनिताने त्यासाठी तयार असलं पाहिजे. तेव्हाच मला मोकळं वाटेल आणि माझ्या कुंडलीत दुसरं लग्न लिहिलेलं आहे”, असं वक्तव्य गोविंदाने केलं होतं.
या मुलाखतीत गोविंदा पुढे इतर सहअभिनेत्रींबद्दल बोलू लागला आणि त्याने दिव्या भारतीला ‘कामुक’ असं म्हटलं होतं. दिव्या त्यावेळी 17 वर्षांची होती आणि हिंदी चित्रपटांमध्ये ती आपली वेगळी ओळख निर्माण करत होती. गोविंदा म्हणाला, “बरं माझा नशिबावर दृढ विश्वास आहे. जे घडायचं असतं ते घडतं. मला जुही खूप आवडतते. दिव्या भारतीसुद्धा आवडते. दिव्या ही अत्यंत कामुक आहे. तिच्यापासून दूर राहणं पुरुषासाठी कठीण आहे. मला माहीत आहे की सुनिता या सगळ्यामुळे खूप नाराज होणार आहे. पण तिला हे माहीत असायला हवं की मी अजूनही दिव्याच्या आकर्षणांचा प्रतिकार करतोय. मी अजूनपर्यंत या मोहाला बळी पडलेलो नाही.”
आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सहा महिन्यांपूर्वीच सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, असा खुलासा गोविंदाच्या मॅनेजरने केला आहे. मात्र दोघांमधील मतभेद हळूहळू कमी होत असल्याचंही त्याने स्पष्ट केलंय.