मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत. हेमा मालिनी यांनी त्यांच्या पुस्तकात धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाविषयी आणि सासू सतवंत कौर यांच्याविषयी लिहिलं होतं.
हेमा मालिनी यांनी नेहमीच स्पष्ट केलं होतं की त्यांना धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाला त्रास द्यायचा नाही आणि याच कारणामुळे त्या त्यांच्यापासून दूर राहतात. मात्र राम कमल मुखर्जी लिखित ‘हेमा मालिनी : बियाँड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात हेमा यांनी सासू सतवंत कौर यांच्याशी भेटीचा उल्लेख केला होता. ईशा देओलच्या जन्मानंतर धर्मेंद्र यांच्या आई हेमा मालिनी यांची भेट घेण्यासाठी डबिंग स्टुडिओमध्ये पोहोचल्या होत्या. विशेष म्हणजे या भेटीविषयी त्यांनी घरात कोणालाच सांगितलं नव्हतं.
लेखकाशी बोलताना हेमा म्हणाल्या होत्या, “धर्मेंद्र यांचे वडील (केवल किशन सिंग देओल) माझ्या वडिलांची आणि भावाची भेट घ्यायचे. त्यांच्याशी हात मिळवण्याऐवजी ते आर्म रेसलिंग करायचे. वडिलांना आणि भावाला आर्म रेसलिंगमध्ये हरवल्यानंतर ते मस्करी म्हणायचे, ‘तुम्ही तूप-माखन-लस्सी खा, इडली आणि सांबारने ताकद मिळत नाही.’ हे ऐकून माझे वडील खूप हसायचे. धर्मेंद्र यांचे वडील फार हसत्या-खेळत्या स्वभावाचे होते.”
सासूबाईंच्या भेटीविषयी त्या पुढे म्हणाल्या, “धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर यासुद्धा तेवढ्याच प्रेमळ आणि दयाळू होत्या. मला अजूनही आठवतंय की त्या मला भेटायला डबिंग स्टुडिओमध्ये आल्या होत्या. त्यावेळी काही दिवसांपूर्वीच ईशाचा जन्म झाला होता. घरात कोणाला काहीच न सांगता भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी मला मिठी मारली. ‘बाळा, नेहमी खुश राहा’ असं त्या म्हणाल्या. त्या माझ्यावर खुश होत्या हे पाहून मीसुद्धा खुश होते.”
नुकताच अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लग्नबंधनात अडकला. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब लग्नसमारंभाला उपस्थित होतं. मात्र हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी या लग्नाला जाणं टाळलं होतं. हेमा यांनी 1968 मधअये सपनों का सौदागर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी जॉनी मेरा नाम, सीता और गीता, धर्मात्मा, शोले, ड्रीम गर्ल, द बर्निंग ट्रेन, सत्ते पे सत्ता, सितापूर की गीता, आतंक, वीर झारा, आरक्षण यांसाख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.