कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. राजू यांच्या पश्चात पत्नी शिखा श्रीवास्तव, मुलगी अंतरा (Antara Srivastava) आणि मुलगा आयुष्मान असा परिवार आहे. राजू यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अंतरा ही विशेष चर्चेत आली आहे. यामागाचं कारण म्हणजे तिने वयाच्या 12 व्या वर्षी केलेलं धाडसी कृत्य. ज्यासाठी तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार तिला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
वयाच्या 12 व्या वर्षी अंतरा श्रीवास्तवने अत्यंत धाडसी कृत्य केलं होतं. तिच्या या कृत्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला होता. राजू श्रीवास्तव यांच्या घरी काही चोर चोरीसाठी आले होते. त्यावेळी अंतरा फक्त 12 वर्षांची होती. घरात अंतरा आणि तिच्या आईशिवाय कोणीच नव्हतं. चोरट्यांनी राजू यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्यावर बंदुक धरली होती. बंदुकीचा धाक दाखवून ते चोरी करत होते.
ही घटना घडली तेव्हा अंतरा तिच्या बेडरूममध्ये होती. तिथून तिने थेट पोलिसांना फोन करून त्यांची मदत घेतली. त्याचवेळी खोलीच्या खिडकीतून तिने हळूच इमारतीच्या चौकीदाराला आवाज दिला. अंतराने चोरांचा धैर्याने सामना केला. अंतराच्या या कृतीमुळे पोलीस आणि चौकीदाराने वेळीच तिला आणि तिच्या आईला चोरांपासून वाचवलं होतं.
या धाडसासाठी अंतराला 2006 मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून तिला हा पुरस्कार मिळाला होता. त्या दहा मिनिटांच्या घटनेनं अंतराचं आयुष्य कायमचं बदलून गेलं होतं. आपल्या मुलीच्या या धाडसाने राजू यांनाही खूप आनंद झाला होता. मुलीला शौर्य पुरस्कार मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
अंतरा सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिने फ्लाइंग ड्रीम एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 2013 मध्ये तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ यांसारख्या चित्रपटांसाठी तिने काम केलं आहे.