अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान हे प्रत्येक वेळी त्यांच्या मुलाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. सलमान जेव्हा कधी वादाच्या भोवऱ्यात अडकला, तेव्हा त्यांनी त्याची साथ दिली. यासाठी त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला. मात्र सलमानलाही त्याची चूक समजावी आणि त्याने त्यासाठी माफी मागावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. असाच एक वाद सलमान आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्यात झाला होता. एका पार्टीदरम्यान सलमानने सुभाष घई यांच्या कानाखाली मारलं होतं.
“भांडणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी चहा पित होतो, तेव्हा सलमान माझ्याजवळ आला आणि त्याने मला घडलेल्या घटनेविषयी सांगितलं. मी त्याला विचारलं की त्याला चूक समजली का? तेव्हा सलमानने त्याच्या चुकीची कबुली दिली आणि दारुमुळे भांडण झाल्याचं सांगितलं. मी त्याला लगेचच सुभाष घई यांना कॉल करून माफी मागण्याचा सल्ला दिला होता आणि त्याने तसंच केलं”, असं सलीम खान यांनी ‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
सलमान खान आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद तर अनेकांनाच माहित आहे. 2003 मध्ये विवेकने सलमानविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी तो सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायला डेट करत होता. या पत्रकार परिषदेत त्याने सलमानवर बरेच आरोप केले होते. याविषयी सलीम खान एका मुलाखतीत म्हणाले होते, “भावनिक समस्यांसाठी कोणतंच तार्किक किंवा तर्कशुद्ध उपाय नसतो. विवेक आणि सलमान हे दोघं भावनिक आहेत. पुढे काही वर्षांनंतर त्यांना त्यांची चूक समजेल आणि क्षुल्लक गोष्टीवर आपण भांडलो असं वाटेल.”
2009 च्या आधी सलमानच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत होत्या. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत हेत आणि दुसरीकडे तो विविध केसेसमध्येही अडकत होता. सलीम खान हे ज्योतिषीसुद्धा आहेत. त्यावेळी त्यांनी असं भविष्य वर्तवलं होतं की 2009 नंतर सलमानचं आयुष्य बदलेल. “तो सध्या ज्या समस्यांमध्ये अडकला आहे, त्यातून तो लवकरच बाहेर येईल. 2009 पासून त्याचं आयुष्य चांगल्याप्रकारे बदलेल. जर सलमानला लग्न करायचं असेल तर ते या एक-दोन वर्षांत होऊ शकेल, अन्यथा पुढे काही सांगता येत नाही”, असं ते म्हणाले होते.