अभिनेता संजय दत्त त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचसोबत त्याच्या कुटुंबाचं राजकारणाशी गहिरं नातं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हरयाणामधील करनाल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून त्याला तिकिट देण्यात येईल म्हटलं जातंय. मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचं संजय दत्तने स्पष्ट केलं. सध्या तरी निवडणूक लढवणार नसल्याचं आणि भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याचा विचार केला तर त्याविषयी स्वत:च जाहीर करणार असल्याचं त्याने सांगितलंय. या चर्चांदरम्यान संजय दत्तचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो राजकारणात प्रवेश करण्याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसतोय.
संजय दत्त त्याच्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा कपिलने संजयला विचारलं होतं, “या चित्रपटात (प्रस्थानम) तुम्ही म्हणता की राजकारण म्हणजे सिंहाची स्वारी, उतरल्यास विषय संपला. तुमच्या वडिलांनी सिंहाची स्वारी केली होती, बहीण सिंहाची स्वारी करतेय आणि आता तुमचा विचार काय आहे?” या प्रश्नाचं संजय दत्तने अत्यंत मजेशीरपणे उत्तर दिलं होतं. “मला गाढवाची स्वारी आवडते”, असं तो म्हणाला. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
संजय दत्तने नुकतंच त्याच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडलं. सोशल मीडियावर त्याने लिहिलं, ‘मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम देतो. मी कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होत नाहीये किंवा निवडणूक लढवत नाहीये. जर मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्याची घोषणा मी स्वत:च करेन. कृपया माझ्याबद्दल सध्या ज्या चर्चा होत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका.’ संजय दत्त राजकारणात प्रवेश करण्याविषयीच्या या चर्चा पहिल्यांदाच होत नाहीत. याआधी 2019 मध्ये संजय दत्तने महाराष्ट्राचे मंत्री महादेव जानकर यांचा हा दावा फेटाळून लावला होता. त्यावेळी संजय दत्त हा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.