युट्यूबर अरमान मलिकचं खासगी आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणेच आहे. काही दिवसांपूर्वीच तो दोन्ही पत्नींसोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर त्याची पहिली पत्नी पायल मलिकला घरातून बाहेर पडावं लागलं. आता बिग बॉसच्या घरात अरमान आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक एकत्र आहेत. बिग बॉसच्या घरात आल्यापासून अरमानची दोन्ही लग्नं सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. अनेकांनी यावरून टीका केली. अशातच अरमानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी पहिली पत्नी पायल मलिकचे कुटुंबीय कारणीभूत ठरले होते.
अरमानने पायलचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. या लग्नाबद्दल कळताच पायल तिच्या मुलाला घेऊन घर सोडून गेली होती. जवळपास वर्षभर ती अरमानपासून दूर राहिली होती. दुसऱ्या लग्नानंतर अरमान आणि पायलच्या आयुष्यात बरेच चढउतार आले होते. एक वेळ अशी आली होती, जेव्हा अरमानने त्याचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी तो दिल्लीतील हरीनगर परिसरातील एका हॉटलेच्या छतावर चढला होता. त्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. अखेर 19 तासांच्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर पोलिसांनी अरमानला इमारतीखाली आणलं होतं.
हॉटेलच्या छतावर चढताना अरमानने स्वत:चा व्हिडीओसुद्धा बनवला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करत असल्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्याचे पायलसोबत वाद सुरू होते. “मी अरमान मलिक, दहाव्या मजल्यावर आहे. मी आत्महत्या करतोय. खाली बरीच लोकं उभी आहेत. माझ्या आत्महत्येचं कारण पायलचा भाऊ नीरज आणि तिच्या दोन बहिणी आहेत. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे मी हे पाऊल उचलतोय. त्यांनी माझ्याविरोधात बलात्काराचा केस दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी ही केस मागे घ्यावी अशी मी विनंती करतो. मी खूप त्रस्त झालोय”, असं तो या व्हिडीओत म्हणतो.
अरमानने आत्महत्येच्या धमकीचे तीन व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केले होते. तेव्हा पायलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर खोटे केस दाखल केल्याचा आरोप त्याने केला होता. पायलने तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अरमानशी लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्या लग्नानंतर त्यांनी तिच्यासोबत काहीच संपर्क ठेवला नव्हता. मात्र अरमानच्या दुसऱ्या लग्नानंतर पायल पुन्हा एकदा तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आली होती.