नव्वदच्या दशकातील सर्वांत गाजलेला चित्रपट ‘नसीब अपना अपना’ तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवलं आणि रडवलंसुद्धा. यामध्ये पती-पत्नीच्या नात्यासोबतच सवत आणि तिच्याशी संबंधित भावभावना पहायला मिळाल्या. यामधील फराह नाज आणि ऋषी कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. तर वाकड्या वेण्यांमध्ये दिसलेली चंदोसुद्धा चांगलीच चर्चेत होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमारने ही भूमिका साकारली होती.
‘नसीब अपना अपना’ या चित्रपटात चंदोची भूमिका साकारून राधिकाला तुफान लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. हिंदीत तिने ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. राधिका तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. तिने एक-दोन नाही तर तीन वेळा लग्न केलंय.
1985 मध्ये तिने पहिल्यांदा अभिनेता आणि निर्माता प्रताप पोथेनशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. प्रतापला घटस्फोट दिल्यानंतर तिने ब्रिटीश अभिनेता रिचर्ड हार्डीशी लग्न केलं. रिचर्डसाठी ती देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठीही तयार होती. मात्र रिचर्डसोबत तिचं लग्न फक्त दोन वर्षेच टिकलं. रिचर्ड आणि राधिका यांना एक मुलगी आहे. या मुलीने भारतीय क्रिकेटर अभिमन्यू मिथुनशी लग्न केलं. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलॉर या टीमकडून खेळला होता.
दुसऱ्या घटस्फोटानंतर राधिकाने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणी आर. सरथकुमार यांच्याशी तिसरं लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. आता राधिका पडद्यापासून दूर असून राजकारणात सक्रिय आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांनंतर राधिकाने टीव्हीवरही काम केलं होतं. मात्र टीव्हीवर फारसं यश न मिळाल्याने ती राजकारणाकडे वळाली. सध्या राधिका भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.