अभिनेत्री सुष्मिता सेनने वयाच्या 24 व्या वर्षी अत्यंत मोठा निर्णय घेतला होता. असा निर्णय घेताना अनेकजण पुनर्विचार करतात. मात्र सुष्मिता त्याबाबत ठाम होती आणि या निर्णयात तिला तिच्या वडिलांनी पाठिंबा दिला. हा निर्णय होता मुलीला दत्तक घेण्याचा. तिच्या या निर्णयाचं आजही खूप कौतुक केलं जातं. एका मुलाखतीत सुष्मिता तिच्या दत्तक घेतलेल्या मुलीच्या खऱ्या आईवडिलांविषयी व्यक्त झाली होती. रेने असं तिच्या या मुलीचं नाव आहे. रेनेच्या 18 व्या वाढदिवसापूर्वी सुष्मिताने तिला तिच्या खऱ्या आईवडिलांबद्दल जाणून घेण्याच्या हक्काविषयीची माहिती दिली होती. इतकंच नव्हे तर तिची इच्छा असल्यास त्यांचा शोध घेण्याचीही तयारी सुष्मिताने दाखवली होती.
“तुला तुझ्या खऱ्या आईवडिलांबद्दल जाणून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. तुझी इच्छा असल्यास आपण त्यांना शोधू आणि यात मी तुझी पूर्ण मदत करेन”, असं सुष्मिताने रेनेला म्हटलं होतं. त्यावर तिला मुलीकडून आश्चर्यकारक प्रतिक्रिया मिळाली. मला माझ्या खऱ्या आईवडिलांना शोधण्यात किंवा त्यांना भेटण्यात काही रस नाही, असं रेने तिला म्हणाली. खुद्द सुष्मिताने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. सुष्मिताने आजवर लग्न केलं नाही. 2000 मध्ये तिने रेनेला दत्तक घेतलं. त्यानंतर दहा वर्षांनी तिने अलिसाला दत्तक घेतलं होतं. सुष्मितानेच या दोघींचा सांभाळ केला. सुष्मिताच्या पावलांवर पाऊल टाकत रेनेसुद्धा अभिनयक्षेत्रात काम करू लागली आहे. तिने ‘सुट्टाबाजी’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. कबीर खुरानाने या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं होतं.
महिला दिनानिमित्त सुष्मिताने मुलींना दत्तक घेण्याच्या निर्णयाविषयी खास पोस्ट लिहिली होती. ‘वयाच्या 24 वर्षी रेने माझ्या आयुष्यात आली. माझ्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता. अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला होता. दत्तकच का? लग्न न करता तू एका बाळाचा सांभाळ कसं करशील? एकल मातृत्वासाठी तू तयार आहेस का? या तुझ्या निर्णयाचा परिणाम तुझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर काय होईल माहितीये का? असे प्रश्न आणि मतं असंख्य होती. तरीसुद्धा मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मी आई होण्यासाठी तयार होते आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता’, असं तिने लिहिलं होतं.