मुंबई : बाबा सिद्दीकी दरवर्षी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. यंदाही त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांसाठी इफ्तार पार्टीचे ( baba siddique iftar party 2023 ) आयोजन केले होते. बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीत सलमान खान, शाहरुख खान, कतरिना कैफ, तारा सुतारिया, सुनील शेट्टी आणि इतर अनेक स्टार्सने हजेरी लावली. बाबा सिद्दीकी सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या सेलिब्रिटींसोबतच्या मैत्रीमुळेही चर्चेत आहेत.
दरवर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत तारे-तारकांची जत्रा असते. बॉलिवूडचे सुपरस्टार आवर्जुन उपस्थित राहतात. बाबा सिद्दीकी हे मुंबईत काँग्रेसशी संबंधित असून तेथून ते आमदारही राहिले आहेत. सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत.
माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांनी रविवारी ताज लँड्स एंड, वांद्रे, मुंबई येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली.
बाबा सिद्दीकी यांच्या घरावर 2017 मध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात छापा टाकला होता. या व्यतिरिक्त ईडीने इतर 5 ठिकाणी छापे टाकले होते.
डी कंपनीचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने धमकी दिल्यावरही बाबा सिद्दीकी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मुंबईतील जमिनीच्या तुकड्यावरून बाबा सिद्दीकी आणि दाऊदचा जवळचा मानला जाणारा अहमद लंगडा यांच्यात वाद झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने बाबाला फोन करून राम गोपाल वर्मा यांच्याशी बोलून तुमचा चित्रपट एक था एमएलए बनवू, अशी धमकी बाबाला दिली होती. बाबाने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली होती.