मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं 9 मार्च रोजी दिल्लीत हार्ट अटॅकने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. सतीश कौशिक मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. कौशिक यांना त्यांच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बरेच प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते. आता निधनानंतर त्यांच्या कंपनीचा मालक कोण होणार, प्रॉडक्शन हाऊसचं काम कोण पाहणार असे प्रश्न उपस्थित झाले.
सतीश कौशिक यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती त्यांची खूप खास होती. ही व्यक्ती म्हणजे कौशिक यांचा पुतणा निशांत कौशिक. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते सतीश कौशिक यांच्यासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. “ते मला त्यांचा मुलगाच मानायचे. अगदी वडिलांसारखं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. त्याचसोबत ते माझ्या करिअरमधील सर्वांत मोठे मेंटॉरसुद्धा होतं. माझ्या करिअरमधील सर्वांत मोठा ब्रेक त्यांनी मला दिला होता. त्यांनीच मला सतीश कौशिक एंटरटेन्मेंटचा निर्माता बनवलं होतं. आम्ही जवळपास 12 वर्षांपासून एकत्र काम करत होतो. या इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. आता त्यांच्या निधनानंतर माझ्या डोळ्यांसमोर फक्त अंधार आहे. काकांचे मित्र बोनी कपूर, अनुपम खेर, सलमान खान, अशोक पंडित हे आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत”, असं ते म्हणाले.
सतीश कौशिक यांच्या बिझनेसविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “सतीशजी यांचे जे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. माझी काकी (सतीश कौशिक यांची पत्नी) आता या कंपनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेल. जसं मी माझ्या काकासोबत मिळून काम करायचो, तसंच मी आता काकीसोबत मिळून काम करणार आहे. शो मस्ट गो ऑन हे काकांचं ब्रीदवाक्य होतं. त्यामुळे कंपनीचं काम चालूच राहील.”
मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.