अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि वाद हे जणू समिकरणच बनलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील नितीन भावे यांनी लिहिलेले कविता केतरी चितळेनं फेसबुकवरुन शेअर केली. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्यावर टीका केली. केतकी याआधीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगलाही (Trolling) सामोरं जावं लागलं. सतत वादात अडकणारी ही केतकी नेमकी आहे तरी कोण आणि तिचे वादग्रस्त पोस्ट कोणते होते, ते पाहुयात..
केतकी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. मात्र या मालिकेनंतर ती फारशी कुठे दिसली नाही. केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी तर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळेच अधिक चर्चेत असते. एपिलेप्सी या आजारावरील पोस्टमुळेही ती चर्चेत आली होती. किंबहुना याच आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. या आजारावर केतकी वेगवेगळे उपचार घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नावदेखील ‘एपिलेप्सी वॉरियर क्वीन’ असं ठेवलं आहे.
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबद्दल भाष्य केलं होतं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणानंतर अग्रिमाने माफी मागितली. मात्र त्यानंतर केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने शिवप्रेमी नाराज झाले होते. महाराजांनी दिलेली शिकवण विसरुन जात त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करतात, असं केतकीने लिहिलं होतं. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. या पोस्टसंदर्भात शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप करत तिने स्क्रीनशॉटही शेअर केला होता.
केतकीनं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये विविध धर्म-पंथांचा उल्लेख करत लिहिलं होतं, ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’, असं तिने लिहिलं. केतकीनं नवबौद्धांविषयी लिहिलेल्या वाक्यावरून नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीत सहभागी असणारे कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शरद पवार यांनी साताऱ्यात 9 मे रोजी एक भाषण केलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी एका कवितेचा संदर्भ आपल्या भाषणात दिला होता. या कवितेतून हिंदू देव देवतांबाबत शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांवरुन वाद सुरु झालेला असतानाच आता केतकी चितळेनं शरद पवारांवर ज्या भाषेत फेसबुक पोस्ट केली आहे, ती अनेकांना खटकली असल्याचं पाहायला मिळतंय.