मुंबई: तब्बल 200 कोटी खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आल्यापासून दर महिन्याला त्याच्याशी निगडीत नवीन अपडेट समोर येत आहे. दिल्ली पोलिसांसोबतच इकोनॉमिक ऑफिस सेलचीही या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर तीक्ष्ण नजर आहे. या खंडणी प्रकरणात पिंकी इराणीला अटक करण्यात आली आहे. ही पिंकी इराणी नेमकी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याप्रकरणात आधीही अनेकदा पिंकीचं नाव समोर आलं होत. इतकंच नव्हे तर जॅकलिन आणि पिंकीला समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी केली होती.
पिंकी ही तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरची सहकारी असल्याचं म्हटलं जातं. मनी लाँड्रींग प्रकरणात तिचीही मोठी भूमिका होती. विशेष म्हणजे पिंकीनेच जॅकलिन आणि सुकेशची पहिल्यांदा भेट घडवून आणली होती, असं कळतंय. ती सुकेशची मॅनेजर होती, असं समजतंय. सुकेशने पिंकी इराणीमार्फत जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि पैसे दिले होते.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंकी आधी एका टीव्ही शोमध्ये अँकर म्हणून काम करत होती. तिच्याविरोधात पुरावे हाती लागल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पिंकीला कोर्टासमोर हजर केलं असता तिला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जेव्हा पिंकी आणि जॅकलिनची समोरासमोर चौकशी केली, तेव्हा अधिकाऱ्यांसमोरच या दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. जेव्हा जॅकलिन आणि पिंकीची समोरासमोर चौकशी केली जात होती, तेव्हा ते जवळपास दोन तास वाद घालत होते.
पिंकीने जॅकलिनवर आरोप केला की, ती सुकेशकडून सतत महागड्या भेटवस्तू स्वीकारत होती. पिंकीने सांगितलं, “जॅकलिनला माहीत होतं की सुकेश 200 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तरीही ती भेटवस्तू स्वीकारत होती.” पिंकी हे आरोप करत असताना जॅकलिनने तिच्यावर खोटं बोलल्याचा आरोप केला. सुकेशच्या पार्श्वभूमीची मला कोणतीच कल्पना नव्हती असं तिने सांगितलं. चौकशीदरम्यान दोघींनी एकमेकींना शिवीगाळही केली.