मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | तमिळ अभिनेत्री आणि राजकारणी गौतमी तडिमल्ला यांचं नाव सध्या चर्चेत आहे. दमदार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेल्या गौतमी या गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून तमिळनाडूच्या भारतीय जनता पार्टीशी जोडलेल्या होत्या. मात्र आता तब्बल 25 वर्षांनंतर त्यांनी भाजपावर गंभीर आरोप करत भलंमोठं पत्र लिहिलं आणि राजीनामा दिला. गौतमीने यांनी सांगितलं की जड अंत:करण आणि निराशेनं त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांनाच मोठा धक्का बसला.
गौतमी यांचा जन्म आंध्रप्रदेशमधील श्रीकाकुलममध्ये 2 जुलै 1969 रोजी झाला. तिचे वडील शेषगिरी राव हे ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर होते. तर आईसुद्धा पेशाने डॉक्टर होती. गौतमी यांनी बिशप कॉटन गर्ल्स स्कूल, बेंगळुरू इथून शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आजवर मल्याळम, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
गौतमी यांनी गणना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ्या अभिनेत्रींमध्ये होते. त्यांनी 1998 मध्ये बिझनेसमन संदीप भाटिया यांच्याशी लग्न केलं. या दोघांना सुब्बुलक्ष्मी ही मुलगी आहे. लग्नाच्या वर्षभरातच गौतमी आणि संदीप विभक्त झाले. पती संदीप भाटियाला घटस्फोट दिल्यानंतर गौतमी यांचं नाव कमल हासन यांच्याशी जोडलं गेलं होतं. हे दोघं जवळपास 13 वर्षांपर्यंत एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. 2016 मध्ये गौतमी यांनी वेगळं होत असल्याचं जाहीर केलं होतं. कमल हासन आणि गौतमी हे 2008 ते 2016 पर्यंत सोबत होते. यादरम्यान दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र कामसुद्धा केलं होतं.
गौतमी यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज दिली आहे. त्यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास गौतमी यांनी रजनीकांत यांच्यासोबत ‘धर्मा दोरई’ आणि याशिवाय ‘नमधु’, ‘पापनासम’, ‘राजा चिन्ना रोजा’ या चित्रपटांमध्ये काम केलं. गौतमी यांनी ‘नकाब’, ‘प्यार हुआँ चोरी चोरी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.