मुंबई : 19 डिसेंबर 2023 | छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ साकारणार कोण? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यापूर्वी ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. त्याचं कारण म्हणजे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते दिग्पाल लांजेकर आणि ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी आता ‘शिवरायांचा छावा’ हा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.
ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच 16 फेब्रुवारी 2014 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. कला-प्रतीक रेडीज, वेशभूषा-हितेंद्र कापोपारा, रंगभूषा-केशभूषा-शैलेश केसकर, साहसदृश्ये-बब्बू खन्ना, नृत्य दिग्दर्शक-विष्णु देवा, किरण बोरकर, ध्वनिमुद्रन/साउंड डिझाईन-निखिल लांजेकर आणि कार्यकारी निर्माता प्रखर मोदी अशी इतर श्रेयनामावली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे.