बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा याने त्याच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचं नाव आज ही घेतलं जातं. त्याची स्टाईल ही त्याची विशेष जमेची बाजु होती. त्याने केवळ आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडली. त्याची डान्स स्टाईलही इतरांपेक्षा वेगळी आहे. आजही लोकांना गोविंदाची गाणी आणि त्याची डान्स स्टाईल आवडते. हिरो नंबर वन गोविंदाचा जन्म मुंबईत झालाय. तो पंजाबी कुटुंबातून येतो. त्यांच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहुजा आणि आईचे नाव निर्मला देवी आहे. त्याने अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई येथे शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. गोविंदाने सुनीता आहुजासोबत विवाह केला, त्याला नर्मदा आहुजा आणि यशवर्धन आहुजा ही दोन मुले आहेत.
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘इलजाम’ या चित्रपटापासून गोविंदाने करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1990 ते 1999 हा काळ गोविंदासाठी खूप चांगला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर यश मिळत गेले. आपल्या करिअरमध्ये गोविंदाने हिरो नंबर वन, कुली नंबर वन, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, स्वर्ग, नसीब यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदा शेवटचा 2019 मध्ये रंगीला राजामध्ये दिसला होता.
तेव्हा गोविंदाची इतकी मागणी होती की, त्याने एका वेळेला ७० सिनेमे साईन केले होते. गोविंदा हा असं करणार पहिला स्टार होता. अभिनेत्याकडे इतके काम होते की तो दिवसातून ५-५ शिफ्टमध्ये शूट करत होता. गोविंदाने तब्बल 14 वर्षे बॉलिवूडवर राज्य केले. हिंदी चित्रपटसृष्टीला त्याने अनेक हिट चित्रपट दिले. पण इतके सिनेमे एकत्र साईन केल्याने सेटवर तासनतास उशिरा यायला लागला. एवढेच नाही तर गोविंदाने निर्मात्यांकडून मागणीही सुरू केली होती की, तो या चित्रपटात फक्त मुख्य भूमिका करणार आहे.
एका जुन्या मुलाखतीत चित्रपट निर्माते पहलाज निहलानी म्हणाले होते, ‘त्याच्यासोबत काम करताना नेहमीच अनिश्चितता होती. त्याने काहीही विचार न करता डझनभर बी-सी ग्रेड चित्रपट साइन केले होते. तो एकाच वेळी 5-6 चित्रपटांवर काम करत होता. नेहमी उशीरा आणि खोटे बोलणे. गोविंदा म्हणायचा की तो हे सर्व पैशासाठी करतोय आणि मी त्याला सांगितले की हा विचार करण्याचा धोकादायक मार्ग आहे. गोविंदा हळूहळू अंधश्रद्धाळू झाला. तो कोणावरही सहज विश्वास ठेवायचा. तो म्हणत असे की सेटवर झुंबर पडणार आहे आणि सर्वांनी दूर राहावे. तेव्हा त्याने कादर खान बुडणार असल्याचा अंदाज वर्तवला. अंधश्रद्धेच्या आधारे तो लोकांना कपडे बदलण्यास सांगत असे. या सर्व गोष्टींमुळे गोविंदाचे करिअर हळूहळू उद्ध्वस्त होत गेले.