मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात 241.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर जगभरातील कमाई 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला त्यालाच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर खरेदीदार मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.
‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्यावर प्रचारकी चित्रपट असल्याची टीका झाली होती. मे महिन्यात प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच काळ चालला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला काही राज्यांमध्ये विरोध करण्यात आला होता. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी होती. तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये ‘ द केरळ स्टोरी ‘ ला टॅक्स फ्री करण्यात आला होता. देशभरात या चित्रपटावरून जोरदार चर्चा झाली होती. अवघ्या 15 ते 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 300 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली होती. गेल्या काही दिवसांपासून आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
आता या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्माते सॅटेलाइट आणि डिजिटल पार्टनर शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक सुदिप्तो म्हणाले की त्यांना चित्रपटासाठी कोणती चांगली ऑफर मिळत नाहीये. इतकंच नव्हे तर फिल्म इंडस्ट्री त्यांना शिक्षा देण्यासाठी गँगअप करतेय असाही आरोप त्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती असल्याचं कळतंय.
इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘ द केरळ स्टोरी ‘ चे निर्माते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी मोठी रक्कम मागत आहेत. तर दुसरीकडे मार्केटची स्थिती पाहता एवढी मोठी रक्कम देणं ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठीण जात आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 70 ते 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे आता ह चित्रपट नेमका कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल याचं उत्तर निर्मातेच देऊ शकतात.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याची टीका झाली होती.