शुक्रवार म्हटलं की सर्वांना आतुरता असते ती नवीन चित्रपट रिलीज होण्याची. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनाही त्यांचे चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकता असते. एकंदरित शुक्रवार हा फिल्म इंडस्ट्र्रीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. कारण त्याच दिवशी ठरतं की हा चित्रपटाचा गल्ला किती जमणार आहे ते. पण तुम्हाला एक माहितीये का की बॉलिवूडमध्ये शुक्रवारी चित्रपट रिलीज होतात पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुरुवारी चित्रपट रिलीज केले जातात.
हॉलिवूडपासून झाली सुरुवात
बॉलिवूडमध्ये जसा शुक्रवार महत्त्वाचा असतो तसाच साऊथमध्ये चित्रपटांसाठी गुरुवार महत्त्वाचा मानला जातो. संपूर्ण आठवड्यात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हे दोनच दिवस का निवडले गेले? तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की, हे दोनच वार का निवडण्यात आले. खरं तर या मागे अनेक कारणं आहेत पण या प्रथेची सुरुवाती ही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळापासून झालेली आहे. चला याचं कारण जाणून घेऊयात.
चित्रपटांसाठी हे गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस निवडण्याची प्रथा म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे ऐतिहासिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत. भारतात चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा अनोखा पॅटर्न 1940 च्या दशकात सुरु झाला आणि तोही हॉलिवूडमध्ये.
हॉलीवूडचा ट्रेंड 1940 चा प्रभाव
हॉलिवूडमध्ये शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड भारतातही हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आणि तो फॉलोही होऊ लागला. 1960 मध्ये भारतात प्रदर्शित झालेला मुघल-ए-आझम शुक्रवारी प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रचंड यशस्वी झाला. तेव्हापासून हा दिवस म्हणजे चित्रपटासाठी लकी असल्याचे मानत शुक्रवारच रिलीजसाठी ओळखला जाऊ लागला.
शुक्रवारचे अध्यात्मिक महत्त्व
चित्रपट निर्मात्यांनी शुक्रवार निवडण्याचे एक मोठे कारण म्हणजे हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की शुक्रवारी सुरू केलेले काम संपत्ती आणि यश देते, म्हणूनच चित्रपट निर्माते या दिवसापासून त्यांचे चित्रपट सुरू करणे शुभ मानतात. आणि ही प्रथाही फार आधीपासूनच सुरु करण्यात आली होती.
साऊथमध्ये गुरुवारची निवड का?
साऊथ चित्रपटसृष्टीत अर्थत साऊथमध्ये गुरुवार हा चित्रपटांच्या प्रदर्शनाचा दिवस मानला जातो. याचे कारण धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय समजुती आहेत. गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांचा दिवस मानला जातो, जो एक शुभ आणि भाग्यवान दिवस मानला जातो. त्यामुळेच दक्षिणेत गुरुवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.
शुक्रवार म्हणजे वीकेंडची सुरुवात
शुक्रवार म्हणजे आठवड्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस. यानंतर शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या असतात. जेव्हा लोक त्यांच्या कुटुंबासह आणि मित्रांसह चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी जातात.चित्रपट प्रदर्शित करण्याचे हे एक व्यावहारिक कारण आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन जास्त होण्यास मदत होते.
आधी चित्रपटांसाठी कोणतेही निश्चित दिवस नव्हते
सुरुवातीला भारतात चित्रपटांसाठी कोणतेही निश्चित दिवस नव्हते. चित्रपट कोणत्याही दिवशी प्रदर्शित होत असत, परंतु चित्रपट उद्योग संघटित झाल्यामुळे आणि विपणन धोरणे बनवल्या गेल्यामुळे चित्रे प्रदर्शित करण्यासाठी शुक्रवार आणि गुरुवार असे दिवस निश्चित केले गेले.
साऊथमध्ये चित्रपटांचे गुरुवार धोरण
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रमोशनला खूप महत्त्व असते. गुरुवारी चित्रपट प्रदर्शित केल्याने प्रेक्षक गुरुवार संध्याकाळपासून वीकेंडपर्यंत उत्सुक राहतात. गुरुवारी रिलीज होण्यापूर्वी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची चर्चा आणि प्रसिद्धी जोरात होते.
खास प्रसंगांना चित्रपट रिलीज करण्याचा ट्रेंड
सण किंवा राष्ट्रीय सुट्टीच्या आसपास चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड देखील खूप पाळला जातो पण त्याच वारांना रिलीज करण्याचा प्रयत्न करतात. जसं की, दिवाळी, ईद किंवा ख्रिसमसच्या दिवशी किंवा त्याच्या आसपासच्या वेळेस प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवतात. मात्र जर आपण सर्वसाधारण रिलीजबद्दल बोललो तर, बॉलिवूडमध्ये शुक्रवार आणि दक्षिणेत गुरुवारला प्राधान्य दिले जाते.
तर, आता तुम्हाला समजलं असेलच की हॉलिवूड आणि साऊथमध्ये चित्रपटांसाठी गुरुवार आणि शुक्रवारच का निवडले गेले आहेत.