युके : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून भारतात वाद सुरूच आहे. मात्र आता या वादाच्या झळा युकेपर्यंत पोहोचल्या आहेत. तिथे ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन म्हणजेच BBFC ने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं नाही. याच कारणामुळे तिथल्या भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे. मात्र BBFC ने खरेदी केलेल्या सर्व तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत केले आहेत. त्याठिकाणी आता द केरळ स्टोरीचं प्रदर्शन टाळण्यात आलं आहे. हा चित्रपट युकेच्या 31 थिएटर्समध्ये हिंदी आणि तमिळ भाषेत 12 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सर्व थिएटर्सच्या वेबसाइट्सवर या चित्रपटाची तिकिटं विकण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि शोज रद्द करण्यात आले आहेत.
सलोनी नावाच्या एका महिलेनं बुधवारी सिनेवर्ल्डमध्ये ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यासाठी 3 तिकिटं खरेदी केली होती. शुक्रवारी 12 मे रोजी त्यांना एक ई-मेल आला. त्यात लिहिलं होतं, ‘सर्टिफिकेशनच्या कारणामुळे BBFC द्वारे चित्रपटाची बुकिंग रद्द करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला तिकिटाचे संपूर्ण पैसे परत पाठवत आहोत. या असुविधेसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.’ युकेमध्ये अनेकांनी हा चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला होता. इतकंच नव्हे तर 95 टक्के स्क्रिनिंगसुद्धा फुल होती. तरीसुद्धा शोज ऐनवेळी रद्द करण्यात आले आहेत.
याविषयी BBFC ने म्हटलंय, “द केरळ स्टोरीच्या सर्टिफिकेशनची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या चित्रपटाचं एज रेटिंग सर्टिफिकेट आणि कंटेंट ॲडवाइज मिळताच, युकेच्या थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.” दुसरीकडे युकेमधील चित्रपट वितरक सुरेश वरसानी यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. त्यांनी BBFC ला बुधवारी चित्रपटाचे तीन व्हर्जन दिले होते. यात हिंदी, तमिळ आणि मल्याळम या भाषांचा समावेश होता. त्यांनी बुधवारी एक आणि गुरुवारी दोन चित्रपट पाहिले होते. त्याच दिवशी एज क्लासिफिकेशनचं काम होऊ शकलं असतं. मात्र तसं झालं नाही. याबद्दल त्यांनी उत्तर मागितलं असता BBFC ने समाधानकारक उत्तर न दिल्याची तक्रार त्यांनी केली.
चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी तीनपेक्षा अधिक दिवस का लागत आहेत, असा प्रश्न वितरकांनी उपस्थित केला. युएसए, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि आयर्लंड याठिकाणी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. मात्र युकेमध्ये सर्टिफिकेशनसाठी कोणती समस्या येत आहे, हे समजत नसल्याचं वितरक म्हणाले. युके सिनेमा आणि त्यांचं 40 ते 50 लाखांचं नुकसान झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. तिथल्या 45 हजार हिंदू आणि जैन लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदू संघटनांनी BBFC ला लेखी पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.