मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 | प्रसिद्ध गायक आदित्य नारायण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावरून त्याच्यावर टीका केली जातेय. या व्हिडीओमध्ये आदित्य त्याच्या कॉन्सर्टमधील एका व्यक्तीचा मोबाइल खेचून घेऊन दूर फेकून देतो. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. स्टेजवर गाणं गात असताना आदित्य अचानक एका चाहत्याजवळ जातो. आधी माइकने त्याच्या हातावर मारतो आणि त्यानंतर त्याचा मोबाइल घेऊन दूर फेकून देतो. त्याच्या या वागणुकीमुळे नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आदित्यने असं का केलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर आता कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून उत्तर देण्यात आलं आहे.
आदित्यचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या आयोजकांनी नेमकं काय घडलं होतं, याविषयीची माहिती दिली आहे. आदित्य स्टेजवर परफॉर्म करताना स्टेजच्या कडेलाच असलेले काहीजण त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने फोन फेकून दिला, असं त्यांनी स्पष्ट केलं. भिलाईमधल्या रुंगटा आर 2 कॉलेजमध्ये हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. आदित्यने ज्या मुलाचा फोन फेकला, तो या कॉलेजचा विद्यार्थी नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे.
‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इव्हेंट मॅनेजर म्हणाला, “तो मुलगा सतत आदित्यचा पाय खेचत होता. म्हणून अखेर वैतागून आदित्यने तसं केलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने आदित्यच्या पायावर अनेकदा मोबाइल आपटला होता. अशात कोणालाही राग येणं स्वाभाविक आहे. या घटनेनंतरही त्याने व्यवस्थित परफॉर्म केलं आणि विद्यार्थ्यांसोबत जवळपास 200 सेल्फी काढले होते.” या घटनेवर अद्याप आदित्यकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे वागण्याची आदित्यची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये आदित्यचा रायपूर एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो एअरपोर्ट सिक्युरिटी स्टाफला धमकावताना दिसला होता. “जर मी तुझा अपमान केला नाही तर माझंही नाव आदित्य नारायण नाही”, असं तो म्हणाला होता.