मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी ठसा उमटवलेले गंभीर प्रवृत्तीचे कलाकार म्हणजे निळू फुले. ‘बाई… वाड्यावर चला’ हा संवाद त्यांनी चंदेरी पडद्यावर जिवंत केला आणि त्यानंतर त्या संवादाची सर कोणालाच आली नाही. रांगडा आवाज, मराठमोळा बाज, भेदक नजर असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. अशा या हरहुन्नरी कलाकाराचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर आदरांजली दिली जात आहे. निळू फुले हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक भान जपण्यासाठीही ओळखले जायचे. त्यांनी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार स्वीकारण्यास नाकारलं होतं. त्यांच्या एका शब्दामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पुरस्काराची सूत्रं हलवली होती.
इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी सोशल मीडियावर हा किस्सा सांगितला होता. 2004 मध्ये हरी नरके हे निळू फुलेंसोबत बसले असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुलेंना फोन आला. ते म्हणाले, “आमच्या शासनाने 2003 या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे. त्यासाठी तुमची संमती हवी.” त्यावर निळू फुलेंनी दिलेल्या उत्तरानंतर पुरस्काराची सर्व सूत्रं हलली.
हरी नरके यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ‘निळूभाऊंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे मी मोजून पैसे घेतो. त्यामुळे समाजासाठी किंवा राज्यासाठी मी काहीही विशेष केलेलं नाही. मुळात आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणंच चूक आहे, असंही निळूभाऊंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं.’
पुढे निळू फुलेंनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांची नावं सुचवली. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीमध्ये मोठं काम केलं, असं त्यांनी सांगितलं. निळू फुलेंचा हा सल्ला विलासराव देशमुख यांनी ताबडतोब ऐकला आणि त्यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. बंग दाम्पत्याला दिला.
निळू फुलेंनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्यातून रंगमंचावर पदार्पण केलं होतं. ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका चित्रपटसृष्टीला वेगळीच ओळख देऊन गेली. त्यानंतर त्यांनी शापित, सामना, पुढचं पाऊल, सिंहासन, सोबती, भुजंग यांसारख्या चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या नायकी आणि खलनायकी भूमिकांना प्रेक्षकांकडून खास पसंती मिळाली. सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी ही त्यांची नाटकं विशेष गाजली.