तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या वादादरम्यान आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुलीसोबत भगवान व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शनापूर्वी पवन कल्याण यांची मुलगी पोलिना हिने गैर हिंदू असल्याच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. पोलिना अल्पवयीन असल्याने तिच्या घोषणापत्रावर वडील पवन कल्याण यांनीसुद्धा स्वाक्षरी केली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवन कल्याण यांच्या मुलीने ‘अहिंदू’ असल्याच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी का केली, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. पोलिना ही पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी अॅना लॅझनिव्हा यांची मुलगी आहे. तिरुपती मंदिर मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून गैर हिंदूंना दर्शनापूर्वी हे घोषणापत्र दिलं जातं. भगवान व्यंकटेश्वर यांच्याबद्दलची श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी हे घोषणापत्र दिलं जातं.
तिरुपती मंदिराच्या नियमांनुसार गैर हिंदू किंवा परदेशातील लोकांना मंदिरात जाण्यापूर्वी या घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी लागते. पोलिना ही परदेशी नागरिक आहे. दर्शनासाठी पवन कल्याण आणि पोलिना यांच्यासोबत दुसरी मुलगी आद्यासुद्धा होती. आद्या ही पवन कल्याण आणि त्यांची दुसरी पत्नी रेणू देसाई यांची मुलगी आहे. जनसेना पक्षाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पवन कल्याण आणि पोलिना यांचा घोषणापत्रावर स्वाक्षरी करतानाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लिहिलंय, ‘उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मुलगी पोलिना अंजनी कोनिडेला यांना तिरुमला व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाआधी एक घोषणापत्र देण्यात आलं. त्यावर त्यांनी स्वाक्षरी केली. पोलिना अल्पवयीन असल्याने तिचे वडील पवन कल्याण यांनीही त्यावर स्वाक्षरी केली आहे.’
Hon’ble Deputy Chief Minister, Sri @PawanKalyan‘s younger daughter, Polena Anjani Konidela, has given a declaration for darshan of Tirumala Sri Venkateswara Swamy. She signed the declaration forms given by TTD (Tirumala Tirupati Devasthanams) officials. Since Polena Anjani is a… pic.twitter.com/FLOQv8CpHB
— JanaSena Party (@JanaSenaParty) October 2, 2024
तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचा धक्कादायक खुलासा झाला होता. यानंतर पवन कल्याण यांनी 11 दिवस प्रायश्चित्त दीक्षा (शुद्धीकरण) पूर्ण केली. त्यानंतर ते मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यात वायएसआरसीपीच्या राजवटीत तिरुपती लाडू तयार करताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप केला होता. तर YSRCP नेते आणि माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.