अहमदाबाद : 20 नोव्हेंबर 2023 | वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतातील कोट्यवधी लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरोधात ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यादरम्यान घडलेल्या काही छोट्या-मोठ्या घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा हा व्हिडीओ आहे. शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी बॉलिवूडमधील इतरही बरेच सेलिब्रिटी मॅच पाहण्यासाठी आले होते. यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचाही समावेश होता. स्टेडियमवर शाहरुखने स्वत: त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली आणि बाजूला बसून बराच वेळ गप्पादेखील मारल्या. यादरम्यान शाहरुखच्या एका कृतीचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि आशा भोसले एकमेकांसोबत आधी गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी आशा भोसले कपमध्ये चहा पित असतात. चहा प्यायल्यानंतर शाहरुख त्यांचा कप उचलतो. नंतर काही स्टाफ मेंबर्स येऊन तिथून कप घेऊन जातात. शाहरुखचा हा नम्र स्वभाव पाहून चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘शाहरुख खरा हिरो आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘मैफल कोणाचीही असो चर्चा मात्र शाहरुखचीच होते’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘म्हणूनच लोक त्याला किंग म्हणतात’, असंही काहींनी म्हटलं आहे.
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी शाहरुख त्याची पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खानसोबत आला होता. यावेळी त्याची मॅनेजर पूजा ददलानीसुद्धा सोबत होती. याशिवाय अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि तिची बहीण अनीशा, वडील प्रकाश पादुकोण हेसुद्धा मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते. वर्ल्ड कपच्या फायनल मॅचबद्दल संपूर्ण देशभरात प्रचंड क्रेझ होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा स्टेडियमवर उपस्थित होते.
दरम्यान 1983 आणि 2011 नंतर तिसऱ्यांदा वर्ल्डकपचा मान, 2003 च्या वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्याचा वचपा, तसंच यजमान देशाने जेतेपद मिळवण्याची प्रथा कायम राखणे या तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघ रविवारी अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा गडी आणि 42 चेंडू राखून विजय मिळवला.