मुंबई : 17 नोव्हेंबर 2023 | वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन टीम वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. यासाठी केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड आणि साऊथ सेलिब्रिटीसुद्धा फार उत्सुक आहेत. अशातच एका अभिनेत्रीने टीम इंडियाच्या विजयावरून अजब घोषणा केली आहे. जर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर समुद्रकिनारी विवस्त्र धावणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे रेखा बोज. ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करते.
रेखा बोजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्ल्ड कपशी संबंधित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, तर मी वैजाग बीचवर विवस्त्र धावेन. रेखाने हा व्हिडीओ फेसबुकवरही शेअर केला आहे. यासोबतच ती भारतीय क्रिकेट टीमला ऑल द बेस्ट म्हणताना दिसतेय. परदेशात स्ट्रिकिंग केल्याचं अनेकदा पहायला मिळतं. स्ट्रिकिंग म्हणजे जर एखाद्या खेळात मोठा विजय प्राप्त झाला, तर त्याचा जल्लोष करण्यासाठी विवस्त्र धावलं जातं. रेखानेही अशाच प्रकारे स्ट्रिकिंग करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘मग तू तयार राहा, टीम इंडिया नक्कीच जिंकणार’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू हे सर्व फक्त नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय’, असं दुसऱ्याने लिहिलं. ‘टीम इंडियाच्या नावावर ही स्वत: फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतेय’, असंही काहींनी म्हटलंय. रेखा बोजने अशा प्रकारची पोस्ट लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अशीच वक्तव्ये केली आहेत. रेखाने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘मंगलयम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलालो’ आणि ‘कलाय तस्मै नम:’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
वनडे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियापुढे रविवारी ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेवर तीन गडी राखून मात केली. अशाप्रकारे त्यांनी आठव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं जातं. त्यामुळे टीम ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाची अंतिम लढत पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.