‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF Chapter 2) हा कन्नड चित्रपट चार विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने अवघ्या सात दिवसांत कमाईचा 250 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सर्व भाषांमधील चित्रपटाची कमाई ही 500 कोटींहून अधिक झाली आहे. बॉक्स ऑफिसवर मिळाला हा प्रतिसाद पाहून चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता यश (Yash) हा भारावून गेला आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “धन्यवाद हा शब्दही आभार मानण्यासाठी पुरेसा नाही”, असं तो म्हणालाय. चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून सध्या त्याच्या मनात काय भावना आहेत, याविषयीही तो व्यक्त झाला. (Yash Video)
“एक छोटंसं खेडं होतं, जिथे बऱ्याच दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रार्थना सभा घेण्याचं ठरवलं आणि त्या सभेत हजर राहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्या सभेत एक मुलगा चक्क हातात छत्री घेऊन आला होता. लोकांनी त्याला मूर्खपणा म्हटलं तर काहींनी त्याला अतिआत्मविश्वास असल्याचं म्हटलं. पण ते नेमकं काय होतं हे माहितीये का? विश्वास. मी त्या लहान मुलासारखा आहे ज्याला हा दिवस पाहण्याचा विश्वास होता”, अशा शब्दांत यशने भावना व्यक्त केल्या.
“मी अशा परिस्थितीत आहे जिथे फक्त तुमचं आभार मानणं पुरेसं नाही. पण तरीही माझ्यावर इतकं प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे मनापासून आभार मानू इच्छितो. धन्यवाद मित्रांनो. माझ्या संपूर्ण KGF टीमच्या वतीने, मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की आम्ही सर्वजण खरोखरच भारावून गेलो आहोत आणि आम्हाला तुम्हाला एक उत्तम सिनेमाचा अनुभव द्यायचा होता. मला आशा आहे की तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेत असाल आणि त्याचा आनंद घेत राहाल”, असं म्हणत व्हिडीओच्या अखेरीस त्याने केजीएफ 2 मधील त्याचा डायलॉग म्हणून दाखवला.
यशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘केजीएफ 2’ या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, श्रीनिधी शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. गुरुवारी या चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला. कन्नड चित्रपटसृष्टीतील हा सर्वांत यशस्वी चित्रपट मानला जातोय.
हेही वाचा:
‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराजनंतर पुढे काय? अखेर मिळालं उत्तर