स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी रायाचं रांगडी रुप पाहिलं आहे. दाढी-मिश्या आणि केस वाढवून आपल्या मित्रांसोबत गावभर हिंडणाऱ्या रायाला प्रेक्षकांनी पाहिलंय. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने रायाचा कायापालट होणार आहे. नव्या रुपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे. नव्या रुपासह रायाचा हाच प्रेमळ स्वभावही यापुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
विठुरायाचं आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे. रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या केसांना कात्री लावली आहे. याविषयी सांगताना विशाल म्हणाला, “कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे ते करणं हे कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. रायाचा लूक चेंज ही कथानकाची गरज होती. गेली दोन वर्षे एका सिनेमासाठी मी केस वाढवत होतो. योगायोगाने येड लागलं प्रेमाचं मालिकेसाठी माझी याच लूकमध्ये निवड झाली. दोन वर्षांनंतर मी स्वत:ला अशा रुपात पहाणार आहे. मी माझा लूक नक्कीच मिस करेन. मला या रुपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार आहे. मला खात्री आहे रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.”
ज्याप्रमाणे रायाची विठुरायावर प्रचंड श्रद्धा आहे त्याप्रमाणेच रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचंही विठुरायासोबत खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो असं विशाल सांगतो. विशालच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. “हरिपाठ, ज्ञानेश्वरी, कीर्तन आणि प्रवचन ऐकत ऐकत मी मोठा झालो. घरच्यांसोबत मी अनेकदा वारीमध्ये सहभागी होत विठुरायाचं दर्शन घेतलं आहे. विठुराया माझं लाडकं दैवत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येड लागलं प्रेमाचं या मालिकेची गोष्टदेखील पंढरपुरात घडते. ही माऊलींचीच कृपा आहे. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो,” अशी भावना विशालने व्यक्त केली.