टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जी हिने ‘शुभ शगुन’ मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप लावले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत निर्मात्याची पोलखोल केली. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेची पोलखोल केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी देखील कृष्णा हिला पाठिंबा दर्शविला आहे. कृष्णा हिने ज्या निर्मात्यावर आरोप केले आहेत, त्या निर्मात्याचं नाव कुंदन सिंह असं आहे.
अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली, ‘याआधी मी कधीच काहीही बोलली नाही. पण माझ्यासोबत जे काही झालं आहे, ते समोर आणण्याचा मी आज निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी कठीण परिस्थितीची सामना करत आहे. आज देखील मी जेव्हा एकटी असते, तेव्हा ढसाढसा रडते. या सर्व गोष्टींची सुरुवात झाली जेव्हा ‘शुभ शगुन’ मालिकेत मी काम करण्याची सुरुवात केली.’
‘मला मालिकेत काम करायचं नव्हतं, पण मी सर्वांचं ऐकलं आणि करारावर सही केली. निर्माता कुंदन सिंह याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केले. मला मेकअप रुममध्ये बंद केलं जायचं. मला माझ्या कामाचं मानधन देखील मिळत नव्हतं, म्हणून मी काम करण्यास नकार दिला. जेव्हा मी मेकअप रुममध्ये असायची आणि कपडे बदलायची तेव्हा रुमचा दरवाजा बाहेरुन मोठ्याने ठोठावण्यात यायचा…’ असं म्हणत अभिनेत्रीने धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘निर्मात्याने गेल्या 5 महिन्यांचं मला मानधन देखील दिलेलं नाही. अनेकदा मला धमक्या देण्यात आल्या. तेव्हा मी अनेकांची मदत देखील मागितली. पण कोणीच माझ्या मदतीला आलं नाही. लोकं फक्त विचारायची तू मालिका का नाही करत… या सर्व गोष्टी माझ्यासोबत पुन्हा होवू नये म्हणून मला भीती वाटत आहे… मला न्याय हवा आहे…’ सध्या सर्वत्र कृष्णा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
कृष्णा मुखर्जी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. अभिनेता अली गोनी याने अभिनेत्रीला पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितलं आहे. तर अभिनेत्री श्रद्धा आर्या, नीना कुलकर्णी, शिरीज मिर्झा आणि अन्स सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे.
कृष्णा मुखर्जी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘नागिन’, ‘कुछ तो है’, ‘ये हैं मोहब्बतें’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.