प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. अरमानने पायल आणि कृतिका या दोघींशी लग्न केलं असून त्यांना चार मुलं आहेत. युट्यूबद्वारे अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी प्रचंड पैसा कमावतात. एका मुलाखतीत अरमानने त्याच्या संपत्तीचा आकडा सांगितला होता. हाच आकडा आता त्याच्यासाठी मोठी समस्या बनला आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये अरमानने खुलासा केला की त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अंडरवर्ल्डची लोकं माझ्या मागे लागली आहेत, असं तो म्हणाला. याप्रकरणी त्याने जिरकपूर पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा केली आहे.
“मला वेगवेगळ्या नंबर्सने धमकीचे फोन येत आहेत. मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. ज्या नंबरने मला फोन येत आहेत, तो नंबर इथला नसल्याने काहीच करू शकत नाहीये. फोन करून ते माझ्याकडून पैशांची मागणी करत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मी सांगितलं होतं की माझी संपत्ती 100-200 कोटींच्या घरात आहे. तेच आता माझ्या अंगाशी आलंय. आता वेगवेगळे गँगस्टर मला फोन करून धमक्या देत आहेत. माझं घर तर सर्वांनाच माहीत आहे, माझा मोबाइल नंबर अनेकांकडे आहे. तरीही मी आता माझा मोबाइल नंबर बदलला आहे”, असं त्याने या व्लॉगमध्ये सांगितलंय.
याविषयी अरमान पुढे म्हणाला, “मी चांगले पैसे कमावतो म्हणजे काही गुन्हा केला का? उन्हाळा, हिवाळा काही न पाहता आम्ही दिवसरात्र काम करतो.” यानंतर अरमानची पत्नी पायल म्हणते, “त्या लोकांना समजत नाही की आमची चार मुलं आहेत. त्यांच्यासाठी 40 लोकांची टीम आहे. त्या 40 लोकांचंही घर चालवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही आमच्या कुटुंबासाठी कमावतोय. लोक फोन करून बोलतात की तू मेला नाहीस तर तुझ्या पत्नी आणि मुलं आहेतच.”
अरमानला फोन करून गुंड दोन ते पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहेत. फोन नंबर बदलल्यानंतर सुद्धा त्याला धमकीचे फोन आले आहेत. कोणीतरी जवळीच व्यक्ती हे सर्व करत असल्याचा संशय अरमानने व्यक्त केला आहे. त्यावर पायल म्हणाली, “आम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. कोणीतरी ओळखीतलाच माणूस हे सर्व करतोय.” धमक्यांमुळे सतत जिवाची भीती वाटल्याने कुटुंबीयांसोबत अधिकाधिक वेळ घालवतोय, असंही अरमानने सांगितलं. “देव न करो उद्या काही बरंवाईट झालं तर लोकांना ही गोष्ट माहीत असावी की आम्हाला सहा महिन्यांपासून धमक्या येत आहेत, म्हणून आम्ही हे तुम्हाला सांगतोय. आमच्यासोबत काय झालं, कोणत्या त्रासातून आम्ही गेलो.. हे तुम्हाला कळावं, या हेतुने हा व्लॉग केलाय”, असंही त्याने सांगितलं.
अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत चंदीगडमधील जिरकपूर शहरात राहतो. अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्येही सहभागी झाले होते. युट्यूबर म्हणून नाव कमावण्याआधी अरमानने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत. एका मुलाखतीत अरमानने त्याची एकूण संपत्ती किती आहे, याविषयी सांगितलं होतं. “आजच्या घडीला माझी संपत्ती 100 ते 200 कोटींच्या घरात असेल”, असं तो म्हणाला होता.