युवराज सिंगचे वडील आमिरच्या ‘या’ चित्रपटाला म्हणाले ‘वाहियात’; चिडले नेटकरी

| Updated on: Jan 14, 2025 | 11:04 AM

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी आमिर खानच्या एका चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नव्हे तर महिलांबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

युवराज सिंगचे वडील आमिरच्या या चित्रपटाला म्हणाले वाहियात; चिडले नेटकरी
Yuvraj Singh, Yograj Singh and Aamir Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग सध्या चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांची चर्चा होतेय. या मुलाखतीत योगराज सिंग यांनी अभिनेता आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटावरही कमेंट केली. युट्यूबर समधीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांनी विविध मुद्द्यांवर आपली बेधडक मतं मांडली आहेत. त्यांनी आमिरच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाला थेट ‘मूर्खपणा’ असं म्हटलंय. त्याचसोबत मुलांना लहानाचं मोठं कसं करावं, याबद्दल त्यांनी त्यांचा दृष्टीकोन सांगितला.

योगराज सिंग यांच्या मते एखादा मुलगा त्याच्या वडिलांच्या प्रभावाखाली खऱ्या अर्थाने घडतो. याविषयी ते म्हणाले, “मुलगा तसाच होईल जसं बाप म्हणेल.” यावेळी त्यांना आमिरच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले, “अत्यंत फालतू चित्रपट आहे आणि मी असे चित्रपट पाहत नाही.” योगराज सिंग यांचं हे वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आलं आहे. आमिर खान दिग्दर्शित ‘तारें जमीन पर’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये आठ वर्षीय ईशान अवस्थीची कहाणी दाखवण्यात आली होती. डिस्लेक्सियामुळे त्याला लिहिता-वाचताना अडचण होते. यामध्ये आमिरने कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.

याच मुलाखतीत योगराज सिंग यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला आहे. “महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्वकाही उद्ध्वस्त करतील. घरचा प्रमुख पुरुष असला पाहिजे. पुरुषच घर चालवू शकतो. जर घरात पुरुष नसेल तर आईकडे घराची जबाबदारी असली पाहिजे”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

योगराज सिंग एवढ्यावरच थांबले नाहीत. याविषयी बोलताना त्यांनी अध्यात्मिक गुरुंचं उदाहरण दिलं. “कुठल्याही बाबाकडे महिला भक्तांची संख्या जास्त असते. त्या तिथे काय मागतात? माझा नवरा, माझा मुलगा माझ्या नियंत्रणात राहिला पाहिजे,” असं वक्तव्य त्यांनी केलंय. महिलांविषयी त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.