मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | झी मराठी वाहिनीवर 12 फेब्रुवारीपासून दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘पारू’ आणि ‘शिवा’ अशी या दोन मालिकांची नावं आहेत. त्यापैकी ‘शिवा’ ही मालिका अगदी पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पहिल्या एपिसोडच्या प्रक्षेपणावेळी काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या मालिकेच्या एपिसोडऐवजी प्रेक्षकांना फक्त प्रोमोच पाहावे लागले होते. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तांत्रिक कारणामुळे पहिल्या दिवशी एपिसोड दाखवता न आल्याने 13 फेब्रुवारी रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या पहिल्यावहिल्या एपिसोडमधील एका सीनची आता सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जातेय. लहान मुलांना कार्टुन दाखवताय का, असा सवाल प्रेक्षकांनी तो सीन पाहून केला आहे.
या मालिकेत दिव्याला इम्प्रेस करण्यासाठी आशु त्याच्या हातात साप पकडतो. मात्र हा साप खराखुरा किंवा खेळण्यातला नसून तो व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. या सीनमधील साप पाहून काही प्रेक्षकांना हसू अनावर झालं. तर अनेकांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर या सीनचा प्रोमो पोस्ट होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि अनेकांनी मालिकेच्या निर्मात्यांना ट्रोल केलं. ‘अरे हा नाग तर विरोचकाचा आहे’ असं एकाने म्हटलंय. तर ‘दुसऱ्या मालिकेतला साप रेडीमेड उचलून इथे आणलाय वाटतं’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने थट्टा केली. ‘एवढं बकवास कुठे असतं का’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘मस्त कॉमेडी, अशी कॉमेडी रोज बघायला आवडेल’, अशी कमेंट एका युजरने केली.
‘शिवा’ या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा फडके यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वप्निल वारके या मालिकेचं दिग्दर्शन करत असून त्यात समीर पाटील, मीरा वेलणकर आणि सविता मालपेकर यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेतील शिवा म्हणजेच शिवानी पाटील. संघर्षनगर नावाच्या वस्तीत राहणारी शिवा ही वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा तिच्या बेधडक स्वभावामुळे, अन्यायाला तोंड द्यायच्या प्रवृत्तीमुळे आणि अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाण्याच्या सवयीमुळे संपूर्ण वस्तीत चर्चेत असते. वडिलांचं अकाली निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शिवावर आहे. तर दुसरीकडे आशुतोष देसाई हा कोट्याधीश आणि अतिशय संस्कारी कुटुंबातील मुलगा आहे. आशु आणि शिवाचा स्वभाव एकमेकांविरुद्ध आहे. पण त्यांच्यात नकळत मैत्रीचं नात तयार होतं. अशा या बिनधास्त आणि बेधडक शिवाला ती जशी आहे तशी हा समाज स्वीकारू शकेल का, याची कथा मालिकेत पहायला मिळते.