मुंबई : यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ मध्ये विक्रमवीर ‘प्रशांत दामले’ ( Prashant Damle ) यांना मराठी रंगभूमीवरील विक्रमी १२५०० नाट्यप्रयोगांनिमित्त झी मराठीने मानवंदना दिली आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘विशेष रंगभूमी पुरस्कार’ ह्यावर्षी प्रथमच झी मराठी वाहिनीकडून जाहीर करण्यात आला आणि या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट ‘दिलीप प्रभावळकर’. तर ह्या वर्षीचा झी नाट्यगौरव २०२३ (Zee Natya gaurav 2023 ) च्या ‘जीवनगौरव पुरस्काराच्या’ मानकरी ठरल्या त्या म्हणजे ‘वंदना गुप्ते’.
२५ डिसेंबर १९७० रोजी, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, द गोवा हिंदू असोसिएशनच्या, मंगला संझगिरी दिग्दर्शित ‘पद्मश्री धुंडीराज’ ह्या नाटकातून पहिल्यांदा रंगमंचावर आल्या. तिथपासून ते ‘.. आणि वंदना गुप्ते’, ह्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप कष्टांचा होता. मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.
या सोहोळ्यात प्रेक्षकांना मराठी नाट्यसृष्टीत आघाडीचा नट शैलेंद्र दातार, उमेश जगताप आणि सुबोध भावे ‘अश्रूंची झाली फुले’ ह्या नाटकातील प्रवेश सादर करणार आहे. तब्बल २५ वर्षानंतर संतोष पवार ‘यदा कदाचित’ ह्या नाटकाचा प्रवेश कमलाकर सातपुते, आशिष पवार, शलाका पवार आणि संजय खापरे सारखे कलाकार साकारणार आहेत, विनोदाचा हुकमी एक्का आणि गेली २५ वर्ष रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेले नाटक “सही रे सही” नाटकाचा प्रवेश भरत जाधव सादर करणार आहे.
‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारणार असून ह्या नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून मुक्ता बर्वे ह्या वंदना गुप्ते यांना मानवंदना देणार आहे. सोबत ‘मन्या आणि मनीची’ धमाल अनुभवता येणार आहे. यंदाच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे लेखन केलंय ते संकर्षण कऱ्हाडे याने.
तेव्हा एका तिकिटात बालगंधर्व ते सही रे सही पर्यंतची हाउसफुल्लचे बोर्ड झळकवलेल्या नाटकांचे प्रयोग पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे, झी नाट्यगौरव पुरस्कार २०२३ हा सोहळा ९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता. झी मराठीवर पाहता येणार आहे.