ऐंशीच्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या दोन दिग्गज अभिनेत्रींमध्ये सध्या ‘कॅट-फाइट’ सुरू झाली आहे. अभिनेत्री झीनत अमान यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लिव्ह-इन रिलेशनशिपचं समर्थन करणारी पोस्ट लिहिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुमताज यांनी झीनत अमान यांच्या खासगी आयुष्यावरून टिप्पणी केली. आता झीनत यांनी मुमताज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “प्रत्येकाची स्वतंत्र मतं असतात. पण मी कधीच इतरांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी केली नाही किंवा माझ्या सहकाऱ्यांचा पाय खेचला नाही. हे मी आतासुद्धा करणार नाही”, असं त्या म्हणाल्या. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तरुणाईला लिव्ह-इन रिलेशनशिपबाबच सल्ला दिला होता. तरुणांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आणि मजबूत नातं तयार होण्यासाठी लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायला हवं, असं त्यांनी म्हटलं होतं.
मुमताज यांनी झीनत अमान यांच्या या सल्ल्याला थेट चुकीचं ठरवलं होतं. कितीही लिव्ह-इनमध्ये राहिलात तरी काय गॅरंटी आहे? अनेक महिने लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरही तुमचं लग्न यशस्वी होईल याची काय गॅरंटी आहे, असा सवाल त्यांनी केला. इतकंच नव्हे तर त्यांनी झीनत अमान यांच्या लग्नावरूनही कमेंट केली. झीनत अमान यांचं स्वत:चं लग्न हे नरकासमान होतं, असं त्या म्हणाल्या होत्या.
“आपण लोकांना काय सल्ला देतोय याची झीनत अमान यांनी काळजी घ्यायला हवी. त्यांना सोशल मीडियावर अचानक ही लोकप्रियता मिळाली आहे आणि कुल आंटी बनण्याची त्यांची ही उत्सुकता मी समजू शकते. पण आपल्या नितीमूल्यांच्या विरोधात जाऊन असा सल्ला देणं हा काही फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा उपाय नाही. मुलींनी जर लिव्ह-इनची संस्कृती अंगीकारायला सुरुवात केली तर एक संस्था म्हणून विवाह कालबाह्य होईल,” अशा शब्दांत मुमताज यांनी टीका केली होती.
झीनत अमान यांच्या वैवाहिक आयुष्यात बरेच चढउतार आले. 1978 मध्ये त्यांनी अभिनेते संजय खान यांच्याशी लग्न केलं होतं. पण या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 1985 मध्ये झीनत यांनी अभिनेते मजहर खान यांच्याशी लग्नगाठ बांधली. 1999 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत झीनत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या उलगडून सांगितल्या होत्या.
“मी स्वतंत्र अभिनेत्री किंवा कलाकार म्हणून मोठी व्हावी, असं मजहरला कधीच वाटत नव्हतं. मी नेहमी घरात राहून मुलाबाळांचा सांभाळ करावा, अशी त्याची इच्छा होती. लग्नाच्या पहिल्याच वर्षानंतर मला मोठी चूक केल्याचं जाणवलं. पण तरीही मी लग्न टिकावं म्हणून प्रयत्न केले. पुढील 12 वर्षे मी हेच करत राहिले. पण त्या अंधाऱ्या वाटेनंतर पुढे माझ्यासाठी प्रकाशच नव्हता. त्या 12 वर्षांत माझ्या आयुष्यात आनंदाचा एकही क्षण नव्हता. तरीसुद्धा मी लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला”, अशा शब्दांत झीनत अमान व्यक्त झाल्या होत्या.