अकोला : आज अनंत चतुर्दशी आहे. दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन केले जात आहे. बाप्पाची भक्तिभावाने सेवा केली. आता जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप (Ganesha Visarjan) दिला जात आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हे सांगायला मात्र, भक्तांचा ऊर दाटून आल्याचे दिसले. कुठे ढोल ताशांचा निनाद (there is the sound of drums), तर कुठे दिंडीचा दणदणाटात (there is the sound of tindi) गुलालाची उधळण करत गणरायाला वाजत गाजत निरोप दिला जात आहे. भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांना बघता बघता 10 दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. गणरायाला निरोप देताना, निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा,माफी असावी अशाच भावना भक्तांचा होत्या.
अकोला शहरात सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे, सजावट केली होती. पर्यावरणासह बेटी बचाव, बेटी पढाव, स्वच्छता आदी संदेश देऊन जनजागृतीचा प्रयत्न केला होता. गणेश विसर्जनासाठी मनपाने शहर कोतवालीसमोर मुख्य गणेश घाट, हरिहरपेठ गणेश घाट, निमवाडी गणेश घाट, हिंगणा गणेश घाट इथे विसर्जनाची तसेच निर्माल्य टाकण्याची वेगळी व्यवस्था केली. मुख्य गणेश घाटावर अनेक कृत्रिम तलाव तयार केले. या तलावात विसर्जन केलेल्या गणपतीचे नंतर कापशी तलाव आणि बाळापूरच्या नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. एकंदरित भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आल्याचं माजी नगरसेवक सागर शेगोगार, भाविक गिरीश जोशी यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा केव्हा येणार याची वाट पाहणार असल्यांच प्रशांत राजूरकर म्हणाले.